लबाड कोल्हा

बाबू पाटलाचा कोंबडा मोठा झोकदार, तांबड्या रंगाचा व तुरेवाला होता. तो गलेलठ्ठही होता. पाटलाच्या घरातील सर्वांचाच तो लाडका राजा कोंबडा होता. राजाला पोटभर खाणे दिले की राजा रूबाबात चालत निघे व वडाच्या झाडावर जाऊन बसे. तेथे उंच शेंड्यावर चढून तो बांग देत राही. एक कोल्हा या गलेलठ्ठ राजाला पाहून नेहमी जिभल्या चाटत राही. राजाचा केव्हा एकदा चट्टामट्टा करेन या विचारात कोल्हा वडाच्या झाडाखालून फेर्‍या मारत राही. दुपारचे चार वाजले. सर्वत्र सामसूम होतं. शेतकरी माणसं शेतात कामावर गेली होती.

राजाने पंख फडफडवले. व मान उंच करून ‘कुकुच कू’ अशी लांबलचक बांग दिली. बांगेचा आवाज ऐकून कोल्हा धावत आला व म्हणाला, ‘‘हे स्वर्गलोकाच्या देखण्या गंधर्वा, काय तुझा आवाज आहे मी धन्य झालो. तू जरा खाली येऊन हा स्वर्गीय स्वर पुन्हा एकदा मला ऐकवशील का?’’ ‘का ऐकवणार नाही? परंतु तुमचा स्वभाव घातकी आहे असं मी ऐकून आहे’ राजा कोंबडा म्हणाला. ‘फार जुन्या गोष्टी झाल्यात त्या. आता बोकेसुद्धा संन्यास घेतात. मांजरी उपवास करतात. आम्ही कोल्ह्यांनी तर आता शाकाहार पत्करला आहे.

’ कोल्हा म्हणाला. ‘असे असेल तर हरकत नाही.’ म्हणत राजा कोंबड्याने झाडावरून घरावर उडी मारली व बाग दिली. ‘कसा काय वाटला आवाज?’ राजाने विचारले. ‘आवाजच ऐकायचा होता. तर झाडावरूनसुद्धा येतच होता की, पण मला तुझ्याकडून गायन शिकायचे आहे.

माझ्या डोक्यावर तुझा हात ठेव व मला शिष्य बनव.’ कोल्हा हात जोडून म्हणाला. ‘ठीक आहे.’ राजा म्हणाला. ‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात’ असं म्हणून राजा कोल्ह्याजवळ येताच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली. राजाने ओळखले आता आपला जीव जाणार तरीसुद्धा राजा म्हणाला, ‘मला तोंडात पकडून देवळामागे ने. तिथे कोणीच नसते. मग मी तुला गायन शिकवतो.’ ‘मला काय, तिकडं तर तिकडं.’

कोल्ह्याने राजाचे पंख तोंडात पकडले तर देवळामागे नेऊ लागला. ते काही लोकांनी पाहिले. ते ओरडू लागले. ‘अरे धरा धरा त्या कोल्ह्याने राजाला पळवले.’ त्याबरोबर काहीजण काठ्या घेऊन कोल्ह्यामागे धावू लागले. तेव्हा कोंबडा म्हणाला, ‘त्या लोकांना सांग.

आम्ही गाणे शिकायला चाललो आहोत. नाहीतर ते तुला मारतील.’ लोकांना सांगण्यासाठी कोल्ह्याने तोंड उघडताच राजा कोंबडा सुटला. राजाने सरळ घराच्या कौलावर उडी घेतली. लोकांनी कोल्ह्याला काठीने मारले.

‘झाली माझी गोष्ट. चला झोपायच्या तयारीला लागा.’ आजोबा म्हणाले. ‘आजी उद्या तू आधी गोष्ट सांगायची बरं का?’ मनोज म्हणाला. ‘हो’ आजी म्हणाली व दीपाने तोंडावर चादर घेतली. आजोबांनी दिवा मालवला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा