शहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ केवळ एका वाहनाच्या भरवशावर

अग्निशमन विभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष; दुर्घटना होऊ नये म्हणून नागरिकांवर देवाचा धावा करण्याची वेळ

अहमदनगर- महापालिकेच्या सावेडी अग्निशामक केंद्राची गाडी वखार महामंडळाच्या गोडावूनजवळ मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी तर केडगावची गाडी कर्मचार्‍यांअभावी बंद असल्याने नगर शहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ सध्या केवळ एका वाहनाच्या भरवशावर आहे. शहरात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून नागरिकांना देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही वेळ केवळ महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आली आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागात अपुरे कर्मचारी तर आहेतच, पण जे आहेत त्यांच्यातही पूर्ण प्रशिक्षित बोटावर मोजण्याइतकेच आहेत. वाढत्या उन्हाळ्यात आगीच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या विभागाच्या सुविधांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. सद्यस्थितीत माळीवाडा अग्निशामक विभागाकडे सात ड्रायव्हर, एक मदतनीस, तसेच फायरमन व क्लार्क मिळून वीस जणांचे संख्याबळ आहे. या सर्वांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. कुणालाही सुट्टी घेता येत नाही. आठवड्याची एक सुट्टीही त्यांना मिळत नाही. सुट्टी घ्यायची असेल, तर विभागाच्या इतर कर्मचार्‍यांवर कामाचा भार येतो. शहरातील घटनांकडे लक्ष ठेवण्यासाठी एका कर्मचार्‍याची कायम फोनजवळ ड्युटी असते. अग्निशामक विभागात फायरमन म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पगार मात्र बिगारी कामगाराचा मिळतो. काही कर्मचारी तर या विभागात 20 ते 30 वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी आस्थापना विभागात पदोन्नतीबाबत विचारले असता, फायरमनपद आस्थापना सूचीत येत नसल्याचे सांगण्यात येते व मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

केडगावचे केंद्र बंद, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे

शहराच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तीन अग्निशमन केंद्रांची निर्मिती केली आहे. शहरात माळीवाडा भागात मुख्य केंद्र असून, उपनगरात सावेडी व केडगाव येथे अग्निशमन उपकेंद्रे आहेत. त्यापैकी कर्मचार्‍यांअभावी केडगाव केंद्र बंद पडले आहे. या ठिकाणी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात सन 2008 मध्ये हे अग्निशमन उपकेंद्र उभारण्यात आले होते. आज मात्र या केंद्राची कचराकुंडी झाली आहे. केडगाव परिसरात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास नगरहून गाडी येण्यास मोठा वेळ जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम हे गेल्या वर्षभरापासून सातत्याने या केंद्रासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.

नव्या वाहनांची तातडीने गरज

शहराचे क्षेत्रफळ पाहता शहरासाठी आणखी दोन अग्निशामक गाड्यांची आवश्यकता आहे. जुन्या अग्निशामक वाहनांची कालमर्यादा संपली आहे. त्या जुन्या झाल्या आहेत, तरीही कर्मचारी त्याच वाहनावर शहर सुरक्षेचा गाडा हाकत आहेत. नवीन गाड्यांची मागणी केली आहे; परंतु यावर अजून काही कार्यवाही झालेली नाही.

कर्मचारी करतात जीव धोक्यात घालून काम

माळीवाडा केंद्रात अपुर्‍या गाड्या व अपुर्‍या कर्मचार्‍यांवर काम सुरू आहे. अग्निशमन विभागाला महापालिका क्षेत्रासह एमआयडीसी भागातही काही आपत्ती घडल्यास काम करावे लागते. शहरात आग लागली वा अन्य काही आपत्तीजनक प्रकार घडल्यास अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे हजर असतात. जिवाची पर्वा न करता त्या प्रसंगांना सामोरे जातात. मात्र, ही जोखीम पत्करताना जर कर्मचार्‍याला काही झाले, तर त्याचा खर्चदेखील पालिका करीत नाही, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. तो खर्च कर्मचार्‍याला स्वतः करावा लागतो.

महापालिकेने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज

वाढत्या तापमानामुळे शॉर्टसर्किट, एसी-गॅस लिकेजसारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने यातून दुर्घटना होण्याची शक्यता असते. वर्षभरापूर्वी चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या कला दालनास लागलेल्या आगीच्या वेळी मनपाच्या अग्निशमन दलाची दयनीय स्थिती स्पष्ट झाली होती. तिच्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. तसेच मागील महिन्यात केडगावच्या अंबिकानगर बसथांब्याजवळील जिल्हा परिषदेच्या शाळेलगत असलेले रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. महापालिकेचे केडगावचे अग्निशामक उपकेंद्र बंद असल्याने नगर शहरातून अग्निशामक गाडी आल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे सध्या तरी अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी देवाकडे धावा करण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशामक विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.