मित्रांबरोबर झालेल्या वादातून गोळीबार; युवकाचा मृत्यू

अहमदनगर- मित्रांसोबत झालेल्या वादातून आठरा वर्षाच्या तरुणावर गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी येथील हसनपूर रस्त्यावरील साई छत्रपती हॉटेलच्या आवारात रविवारी (दि.1) रात्री साडेनऊ वाजता घडली. फरदीन उर्फ भय्या अब्बू कुरेशी (वय 18, रा.श्रीरामपूर) असे मृत युवकाचे नाव असून फरदीन हा जेवण करण्यासाठी व मद्यपान करण्यासाठी उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी (चौघे रा.लोणी), संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ आयुब शेख, शाहरुख शाह पठाण, फरदीन उर्फ भय्या अब्बू कुरेश (तिघे रा.श्रीराम पूर) हे सात जण रात्री हॉटेल साई छत्रपती येथे गेले होते.

त्यावेळी त्यांच्यात किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली. कारणावरुन झालेल्या वादातून भांडण झाले त्यातूनच एका जणाने फरदीन याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात फरदीन हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याला तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इतर सर्व जण फरार झाले होते. मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही.

या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. ही घटना आर्थिक देवाणघेवाणीतून घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन सोमवारी (दि.2) सकाळपर्यंत सर्वांना ताब्यात घेतले. पुढील तपास साहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक एन. बी. सुर्यवंशी हे करीत आहेत.