कुटूंब व्यवस्था जपण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा मुख्य उद्देश – न्या. आर.आर. पोंदकुले

अहमदनगर- पती-पत्नीचा वाद न्यायालयात आल्यानंतर दोन्ही कुटूंब व नातेवाईकांचे कुटूंबही डिस्ट्रब होऊन भरडली जावून बाधित होतात. म्हणून कौटूंबिक न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयात आलेले कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी सामाजिक संस्था, तज्ञ समुपदेशक व महिला समाजसेविका यांचे अवर्जुन सहकार्य घेत असते. संपूर्ण जगात आदर्श असणारी भारताची कुटूंब व्यवस्था जपण्याचा मुख्य उद्देश कौटुंबिक न्यायालयाचा आहे. मात्र सध्या टीव्ही चॅनलवरील विविध मालिकांमधून सर्रास नवरा-बायकोचे अफेअर्स कसे योग्य आहे, हेच दाखविले जात आहे. त्याचा दुरगामी परिणाम कुटूंबावर होत आहे, त्यामुळे न्यायालयातील प्रकरणेही वाढत आहेत. ही संवेदनशिल प्रकरणे हाताळण्यासाठी स्वयंसेवी संघटनांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायधिश आर. आर. पोंदकुले यांनी केले.

जुन्या कोर्टमधील कौटुंबिक न्यायालयात आयोजित शहरातील स्वयंसेवी संघटनांच्या बैठकीत न्यायाधिश श्री. पोंदकुले बोलत होते. यावेळी कौटूंबिक न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षक सुषमा बिडवे, न्यायाधारच्या अॅड. निर्मला चौधरी, एस. वाय. कुलकर्णी, विवाह समुपदेशक टी. डी. जगताप आदिंसह शहरातील विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रास्तविकात सुषमा बिडवे म्हणाल्या, कौटूंबिक खटले सोडवितांना न्यायालयास वारंवार सामाजिक संस्थांची गरज भासत असते. पिडीतांना मदत व्हावी, मानसिक आधार मिळावा, यासाठी कौटूंबिक न्यायालय व सामाजिक संस्था एकत्र येवून हा उपक्रम राबवत आहोत. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागामुळे कोर्टाचे कामकाज अधिक सुटसुटीत होऊन खटले लवकर निकाली लागले तर न्यायालयावरील ताण कमी होणार आहे. या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमास शहरातील विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन कोर्टाच्या कामकाजात सहभाग देण्याचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी उपस्थित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी संस्थेमार्फत होत असलेल्या कार्याची माहिती दिली.

यावेळी अनिल गावडे, सचिन बोरुडे, रविंद्र काकळीज, फारुक बेग, अॅड. शोहेब शेख, अॅड. निलिमा भणगे, शिवाजी जाधव, विद्या क्षीरसागर, रजनी ताठे, विनायक उरणकर, अॅड. भानुदास होले आदि उपस्थित होते.