राष्ट्रीयकृत बँकांच्या नावे फेक कॉल करून ऑनलाईन फसवणुकीचा फंडा

अहमदनगर – ’हॅलो, सर मी तुमच्या अमुक-अमुक बँकेतून बोलत आहे. तुम्हाला तुमचं सध्याचं एटीएम कार्ड बदलून नवीन कार्ड देण्यात येतंय, त्यासंदर्भात तुम्हाला तुमच्या सध्याच्या एटीएम कार्डची काही माहिती द्यावी लागेल’ असं म्हणत डेबिट/क्रेडिट अशा एटीएम कार्ड धारकांना गंडा घालण्याचा नवा फंडा आता समोर येतोय. यातून काही क्षणातच अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा फोन आला तर सावधान! अशी कुठलीही माहिती देवू नका नाहीतर काही क्षणात तुम्ही ऑनलाईन गंडवले जाऊ शकता.

टेक्नोलॉजीचा वापर चांगल्या कामासाठी करण्यात येतो. मात्र, याच टेक्नोलॉजीचा अनेकजण चुकीचा वापर करत आहेत. ऑनलाईन फसवणुकीसाठीही सध्या याच टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येत आहे. ऑनलाईन फसवणुकीसाठी सध्या फोन कॉल्सचा वापर होत आहे. गुन्हेगार तुमच्यासोबत अवघे काही मिनिटं किंवा सेकंद फोनवर बोलुन तुम्हाला लाखोंचा चूना लावू शकतात. हे गुन्हेगार तुमच्यासोबत फोनवर भाष्य करत असताना अनेक प्रकारच्या ऑफर्सचं आमिष दाखवत तुम्हाला गुंतवूण ठेवतात आणि मग हळूच तुमच्याकडून वैयक्तीक माहिती काढण्यास सुरुवात करतात. त्यानंतर हळू-हळू तुमच्याकडून तुमच्या बँक अकाऊंटची माहिती काढून घेतात. त्यानंतर तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करतात.

स्वत:ला बँकेचे अधिकारी सांगतात

फोनच्या माध्यमातून नागरिकांना फसवण्यासाठी आरोपी फोन केल्यावर तुम्हाला बँकेचे अधिकारी बोलत असल्याचं सांगतात. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्हालाही अज्ञात नंबर किंवा व्यक्तीचा फोन आला तर सावध रहा. काही वेळा काही महिलाही अशाप्रकारे फोन करत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. या महिलांच्या गोड बोलण्याला भुरळून गेलात तर तुम्ही लुटले गेलात हे नक्की.

नागरिकांनी ’ही’ काळजी घ्यावी

जर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने तुमची वैयक्तिक माहिती मागितली तर, अशी माहिती अनोळखी व्यक्तीला चुकूनही देवू नका. जर चुकून अशी माहिती दिली गेली तर तात्काळ बँकेशी संपर्क साधून तुमचं बँक अकाऊंट ब्लॉक करण्यासंदर्भात बोला. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमच्या अकाऊंटमधील रक्कम त्या आरोपीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर होऊ शकते.

पोलिसांना द्या तात्काळ माहिती

अशी घटना तुमच्यासोबत झाली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. योग्यवेळी पोलिसांना माहिती दिल्यास आरोपी गजाआड करण्यास पोलिसांनाही मदत होते. तसेच तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसेही सुरक्षित राहतात. कोणतीही बँक आपल्या ग्राहकाची केवायसी मोबाईल फोन वर करीत नाही. त्याबाबत काही सूचना असतील तर त्याचा एसएमएस पाठवून बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधण्यास कळवीत असतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखवत आपली फसवणूक टाळावी असे आवाहन राष्ट्रीयकृत बँकांच्या नगरमधील स्थानिक अधिकार्‍यांनी केले आहे.

फेक कॉल करणाराची नगरमधील जागरूक नागरिकाने घेतली फिरकी

नगरमधील एका जागरूक बँक ग्राहकाला नुकताच असाच अनुभव आला. त्यास 0916289157082 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलत आहे. आपण केवायसी न केल्यामुळे आपले एटीएम कार्ड बंद झाले आहे. ते सुरु करण्यासाठी थोडी माहिती द्या असे सांगण्यात आले. हा फेक कॉल असल्याचे त्या जागरूक ग्राहकाच्या लक्षात आल्याने त्यानेही त्याची फिरकी घेण्याचे ठरविले. कारण या ग्राहकाचे वा त्याच्या घरातील कोणाचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये साधे खातेही कधी उघडले गेलेले नव्हते. त्यामुळे त्याने विचारले काय करावे लागेल. तर तिकडून एटीएम कार्ड नंबर एक्सपायरी डेट, पीन नंबर विचारला गेला. या ग्राहकाने तो बनावट नंबर सांगितला. त्यानंतर आपल्या मोबाईल वर ओटीपी येईल तो सांगा असे सांगण्यात आले. मात्र सुमारे 20 मिनिटे झाली तरी ओटीपी काही आला नाही. त्यामुळे तो फेक कॉल करणाराही वैतागला. तुम्ही चुकीची माहिती देत आहात. खरी माहिती द्या. नाहीतर तुमचे खाते कायमचे बंद करू अशी धमकी देवू लागला. मग या ग्राहकानेही चढ्या आवाजात मी खाते उघडलेच नाही तर तु काय बंद करणार. उलट तुझा हा मोबाईल क्रमांक मीच पोलिसांकडे देतो आणि तुझी दुकानदारी बंद करतो असा उलट दम भरल्यावर त्या फेक व्यक्तीने शिवीगाळ करत फोन बंद केला.

आयटी रिफंडचेही फेक मेसेज

फेक कॉल बरोबरच नागरिकांच्या मोबाईलवर आयटी रिफंडचे फेक मेसेजेस् येत असून त्याद्वारेही नागरिकांची लुबाडणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकांना तुमचे इन्कमटॅक्स रिफंड रक्कम (ठराविक रक्कम टाकलेली असते) मंजूर झाले असून ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल, तुमचा खाते क्रमांक बरोबर आहे काय असे सांगत एखादा खातेक्रमांक टाकला जातो तसेच जर खाते क्रमांक चुकीचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुमचा खातेक्रमांक तपासून पहा असे या मेसेजमध्ये सांगितलेले असते त्यानुसार ती लिंक ओपन केल्यास संपुर्ण माहिती भरावयास सांगितली जाते. ती माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच बँक खात्यातील रक्कम काढून घेतले जाते. अनेक नागरिकांना या ऑनलाईन लुटीचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा फेक मेसेजपासून सावधानता बाळगावी तसेच असे मेसेज लगेच मोबाईलमधून डिलीट करुन टाकावेत.