नगरमधील महावीर भवन येथे माफक दरातील भोजन व्यवस्थेचा विस्तार

एकाचवेळी 100 लोकांच्या भोजनाची तारांकित व्यवस्था

अहमदनगर- जैन सोशल फेडरेशनने आनंदॠषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने व आदर्शॠषीजी म.सा. यांच्या प्रेरणेने आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देतानाच 2012 मध्ये रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचा विचार करून महावीर भवनची उभारणी केली. याठिकाणी अतिशय अत्यल्प दरात रुग्णांच्या नातेवाईकांची चहा, नाष्टा, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. आता या सेवा कार्याचा आणखी विस्तार करीत महावीर भवन येथील भोजनगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आता एकाचवेळी 100 लोक आरामशीर बसून भोजनाचा आस्वाद घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अगदी तारांकित सोयी सुविधा देताना महावीर भवनात पूर्वीचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जैन सोशल फेडरेशनच्यावतीने देण्यात आली.

आनंदॠषीजी हॉस्पिटलमध्ये नगरसह राज्याच्या विविध भागातून रुग्ण येत असतात. रुग्णाला अॅॅडमिट केल्यानंतर परगावच्या रुग्णांच्या नातेवाईकांचा निवासाचा, भोजनाचा प्रश्न निर्माण होतो. ही बाब ओळखून जैन सोशल फेडरेशनने हॉस्पिटलच्या आवारातच महावीर भवनाची प्रशस्त इमारत उभारली. याठिकाणी अवघ्या 15 रुपयांत नाष्टा तसेच फक्त 30 रुपयांत भरपेट व रूचकर भोजनाची व्यवस्था असते. जेवण, नाष्टा तयार करताना तो पूर्णत: हायजेनिक वातावरणात होईल, सर्वांना पौष्टिक व सात्त्विक आहार मिळेल याची विशेष काळजी घेण्यात येते.

पूर्वीची बैठक क्षमता अपुरी पडू लागल्याने महावीर भवनमधील डायनिंग हॉलचा विस्तार करण्यात आला आहे. आता तब्बल 100 लोक आरामात बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील. फक्त भोजनच नव्हे तर पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्थाही येथे आहे. याशिवाय हात धुण्यासाठी स्वच्छ बेसिनची व्यवस्था आहे. अतिशय पवित्र वातावरणात हायजेनिक व गरमागरम भोजना, नाष्टा याठिकाणी उपलब्ध असतो. महावीर भवनातील केटरिंगची सर्व व्यवस्था मिलापचंद पटवा व अमित पटवा अतिशय श्रद्धेने पाहतात.

सकाळी 8 ते 10 नाष्टा, दुपारचे जेवण सकाळी 11.30 ते दुपारी 3 यावेळेत तर रात्रीचे भोजन सायंकाळी 6.30 ते रात्री 9 यावेळेत अशी व्यवस्था असते. नव्या रुपातील तारांकित दर्जाच्या महावीर भवनातील सेवाविस्तारामुळे अधिकाधिक लोकांची सोय होणार असून या सेवाकार्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा