महापालिकेतील 2 कामगार संघटनांमधील वाद चिघळला नव्या संघटनेत गेलेल्या कर्मचार्‍यास घरात घुसून धमकावले

अहमदनगर- महापालिकेत एक कामगार युनियन असताना कर्मचार्‍याच्या अंतर्गत वादातून आणखी एक कामगार संघटना स्थापन झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघटनेत वाद निर्माण झाला असून त्यातच नव्याने तयार होत असलेल्या संघटनेत गेल्याने मनपा कर्मचार्‍याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.13) दिल्लीगेट येथील म्युन्सिपल कॉलनी येथे घठला आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी कि, जितेंद्र चव्हाण हे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस आहेत. महापालिकेत कामगार संघटना असून, त्याचे अध्यक्ष अनंत लोखंठे आहेत. या संघटनेत जितेंद्र चव्हाण हे सदस्य म्हणून आहेत. गुरुवारी (दि.13) महापालिकेत अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना ही नवीन संघटना झाली. त्यात चव्हाण यांच्यासह तानसेन सुरेश बिवाल, नागेज कंठारे, ऋषिकेश भालेराव, विठ्ठल उमाप, प्रकाश छललानी आहेत. चव्हाण हे नवीन संघटनेतील पदाधिकार्‍यांसोबत शाखा स्थापन करण्यासाठी महापालिकेत गेले होते. त्याचा राग मनात धरून विजय पठारे व इतर तीनजण (सर्व रा.सिद्धार्थनगर, अ.नगर) हे गुरुवारी (दि.13) सायंकाळी चव्हाण यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या पत्नीस म्हणाले कि, ‘तुझ्या पतीला समजावून सांग, तो जास्त शहाणा झाला आहे का? महापालिकेत एक संघटना आहेत व संघटना एकच राहील’. अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेची शाखा महापालिका सुरू करण्यास मदत करू नको. त्यांच्या सोबत राहू नको असे तुझ्या पतीस सांग. तो चुकीचे करत आहे, हे थांबव, असे म्हणून पतीस मारण्याची धमकी दिली. त्यानंतर झालेला हा प्रकार जितेंद्र चव्हाण यांना सांगितला असता त्यांनी विजय पठारे यास फोन करून ‘तू आमच्या घरी का आला होता’, असे विचारले असता त्याने तु चुकीचे करत आहे. सारी वस्ती घेऊन तुझ्याकडे पाहतो, असा दम दिला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अनिता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे व इतर तीन जणांविरोधात भा.दं.वि. कलम 452, 504, 506, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.