नवीन वर्षात जिल्ह्यातील 4 हजार 187 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी

जिल्हा सहकारी बँकेसह मर्चंट बँक, अहमदनगर शहर सहकारी बँक व 8 मोठ्या साखर कारखान्यांचा समावेश

जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघणार त्या दरम्यान, जिल्ह्यातील आठ साखर कारखान्याच्या निवडणुका होणार आहे. त्यात मार्च महिन्यात अशोक, पद्मश्री डॉ. विखे, मुळा, ज्ञानेश्वर, सहकार महर्षी थोरात, वृद्धश्वेर या सहा तर नागवडे व कुकडी कारखान्याची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँक व कारखान्याच्या निवडणुका या दरम्यान असल्याने जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची जोरदर रणधुमाळी दिसून येणार आहे. यात जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. या बँका, कारखान्यासह जिल्ह्यात ब, क, ड या वर्गवारीच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका याही सुरू होत आहे. यावेळी वर्गवारीचे निकष बदलले आहे. त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर संस्था असलेल्या संस्था ब वर्गवारीत आल्या आहेत. तर 250 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या संस्था क वर्ग मध्ये आहे. अशा सर्व 4 हजार 187 सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत.

नगर- विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता येणार्‍या नवीन वर्षात जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. पुढचे वर्ष पूर्णपणे या संस्थांच्या निवडणुकीचे राहणार आहे. त्यामध्ये आशिया खंडात लौकिक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह, जिल्ह्याच्या व्यापार व उद्योग क्षेत्राला मोठा हातभार देणार्‍या अहमदनगर मर्चंट बँक आणि अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीचा समावेश आहे. या शिवाय आठ सहकारी साखर कारखान्यांसह तब्बल 4 हजार 187 सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहेत. त्यामुळे विधानसभेचा धुरडा बसतो न बसतो तोच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू होणार आहे. गेल्यावेळी देखील विधानसभेनंतर या संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या. सन 2014 मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना झाली. हे प्राधिकरण स्थापन होण्यापूर्वी तब्बल तीन सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह संचालक मंडळाला तीन वर्ष मुदत वाढ मिळाली होती. सन 2014 मध्ये प्राधिकरण स्थापन झाले होते. पण त्यावेळी लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे या सर्व निवडणुका सन 2014 च्या डिसेंबरनंतर घेण्यात आल्या. त्यामुळे यंदाही या संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु होत आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, पतसंस्था, पगारदार संस्था, मजूर संस्था, फेडरेशन, बँका, कामगार संस्था, खरेदी विक्री संघ, यांच्या सह 11 बाजार समित्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षांत होणार आहे. या निवडणुकीची तयारी आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्या संस्था निवडणुकीसाठी क्रमप्राप्त आहेत. या संस्थांना मतदार यादी तयार करण्याचे काम करण्याचे सांगण्यात आले आहे. आशिया खंडात नावलौकिक असलेल्या व जिल्ह्याच्या अर्थकारणासह राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची समजल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक साधारणत: मे 2020 मध्ये होत आहे. त्या निवडणूकीची रणधुमाळी मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. माध्यमिक शिक्षकांसाठी कामधेनू असलेली माध्यमिक सोसायटीची निवडणूक फेब्रुवारी 2020 मध्ये होत आहे. त्याबरोबर शहर सहकारी बँक, मर्चन्ट बँकेची निवडणूक साधारणत: ऑक्टोबर 2020 मध्ये होण्याची शक्यता आहे.