महिनाभरापूर्वी केलेला रस्ता एकाच पावसात भूकंप झाल्याप्रमाणे खचला

महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांचे पितळ पडले उघडे; दोषींवर कारवाई होणार का?

अहमदनगर- महापालिकेने अवघ्या महिनाभरापूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता सोमवारी (दि.10) दुपारी झालेल्या पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात खचला आहे. या रस्त्याला मोठमोठ्या भेगा आणि खड्डे पडल्याने काल शहरात फक्त पाऊस पडलाय की भूकंपही झालायं, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या निमित्ताने महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. यामध्ये संबंधितांना दोषी धरले जावून त्यांच्यावर कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे हा गंभीर प्रकारही दाबला जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे. दोन आमदार, माजी खासदार आणि चारही नगरसेवक एकाच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेल्या प्रभाग 14 मधील आचार्य आनंदऋषी हॉस्पिटल समोरील रस्त्याच्या कामाबाबत हा प्रकार घडला आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे या महिना भरापूर्वी केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी भूकंप झाल्याप्रमाणे मोठमोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळत असल्याने नगर शहर महानगर करण्याच्या निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांकडून दिल्या जाणार्‍या घोषणा किती फसव्या असतात हे स्पष्ट होत आहे.

तब्बल दीड वर्षानंतर मिळाला होता कामाला मुहूर्त

शहरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा देण्यासाठी की, नगरसेवकांच्या आग्रहाखातर महापालिकेने शहरातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी निधीही उपलब्ध आहे. मात्र रस्त्यांची कामे काही सुरू होत नाहीत अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. काही कामांचे कार्यारंभ आदेशही दिलेले आहेत. पण कामे काही सुरु झालेली नाहीत. शहराच्या अनेक भागात रस्त्यांची कामे रखडलेली असताना यातून माजी खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप यांची निवासस्थाने असलेला वॉर्डही सुटलेला नव्हता. वॉर्ड क्र.14 मध्ये माजी खासदारआमदारांची निवासस्थाने आहेत. या वॉर्डातील आचार्य आनंदऋषी हॉस्पिटल समोरील रस्त्याचे काम मंजूर होऊन दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला होता. या कामाला तीन महिन्यापूर्वी मुहूर्त मिळाला, काम सुरु झाले पण हे काम दोन ठेकेदारांना विभागून दिले गेले होते.

दोन ठेकेदारांच्या वादात रस्त्याची लागली ’वाट’

एकाने ड्रेनेज लाईन टाकायची तर दुसर्‍याने खडीकरण डांबरीकरण करायचे होते. यातील ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम कसेबसे पूर्ण झाले. पण डांबरीकरण काही सुरु झालेले नाही. त्यावेळी काळे नावाच्या ठेकेदाराला विचारणा केली असता मी माझे काम केले पुढचे काम मेहेर नावाच्या ठेकेदाराकडे आहे. त्यांना विचारणा केली तर काळे ठेकेदाराने ड्रेनेजचे काम व्यवस्थित केले नाही. रस्त्याची ग्राउंड लेवल व्यवस्थित केली नाही. त्यामुळे डांबरीकरण केल्यास ते लवकरच उखडेल. त्यामुळे काम सुरु करू शकत नाही. अशी टोलवा- टोलवी केली जात होती. मात्र नागरिकांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्या मुळे सदर ठेकेदाराने महिना भरापूर्वी हे काम कसे बसे पूर्ण केले. हे काम कोणत्या दर्जाचे केले गेले हे सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसाने दाखवून दिले आहे.

नगरचे महानगर होण्याचे स्वप्न न पाहिलेलेच बरे

महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या 15 वर्षांमध्ये शहरातील रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च झाले, मात्र बोटावर मोजण्याइतक्या अपवादात्मक रस्त्यांची परिस्थिती सोडता शहरातील इतर रस्त्यांची अवस्था नेहमीच खड्डेयुक्त रस्ते अशीच दिसून येत आहे. मात्र तरीही दरवर्षी रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतुद करण्याची प्रथा सुरूच आहे. एवढा निधी खर्च होवूनही कामाचा दर्जा पाहिला तर त्याचा विचार न केलेलाच बरा अशी परिस्थिती आहे. एक महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याची एकाच पावसात अशी भयंकर दुर्दशा होत असेल तर नगरकरांनी महापालिकेकडून आणि राजकीय पुढार्‍यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवून नगरचे महानगर होण्याचे स्वप्न न पाहिलेलेच बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नागरिकांचा कररूपी पैसा गेला पाण्यात

हा परिसर मोठ्या वर्दळीचा आहे. तसेच या परिसरात उच्चभ्रू लोकवस्ती आहे. येथील नागरिक दरवर्षी नियमितपणे महापालिकेकडे कराचा आगावू भरणा करीत असते. तरीही या भागातील नागरिकांना महापालिका मुलभूत सुविधा देत नाही. या रस्त्याचे काम होण्यापूर्वी तब्बल दीड वर्ष या भागातील नागरिकांनी खड्डे, उखडलेली खडी आणि धुळीचाही त्रास मोठ्या प्रमाणात सहन केलेला होता. महिनाभरापूर्वी रस्त्याचे काम झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र त्यांचा हा आनंद अवघ्या महिनाभरात हिरावला गेला आहे. या निमित्ताने नागरिकांनी कररूपी भरलेला पैसा पाण्यात गेला असून याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा