शस्त्रपूजनाने दुर्गा माता दौडचा समारोप

अहमदनगर- नवरात्रौत्सवानिमित्त संभाजी भिडे गुरुजी प्रणित श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्यावतीने हिंदू एकात्मतेसाठी घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत शहरात श्री दुर्गामाता दौडचे आयोजन गेल्या 25 वर्षापासून अखंडितपणे करण्यात येत आहे. यावर्षीही श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे युवक नवरात्रीची 9 दिवस दररोज सकाळी शहरातील विविध ठिकाणच्या देवी मंदिरापर्यंत जाऊन देवीची आरती करत होते. दुर्गामाता दौड उपक्रमाचा समारोप विजयादशमीच्या मुहुर्तावर शस्त्रपूजनाने झाला. यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत शेकडो युवक भाले, खड्.ग, परशु ही देवतांनी व शिवाजी महाराजांनी वापरलेले शस्त्रे घेऊन भगवे फेटा बांधून पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विजयादशमीला सकाळी जुन्या बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वरुढ पुतळ्यास अभिवादन करुन दुर्गामाता दौडच्या समारोप मिरवणुक सुरवात झाली.

हलगी, झांज, संबळीच्या तालावर शंख नाद करत मिरवणुकीत सहभागी झालेले सुमारे 200 युवक स्फुर्तीगीत गात चालत होते. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन नालेगांव चौकात आल्यावर याठिकाणी सर्वांनी विधीवत शस्त्रपूजन करण्यात आले. जय श्रीराम… जय श्रीराम…, छत्रपती शिवाजी महाराजांचा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा व भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषांनी परिसर दुमदुमला. हिंदू धर्माच्या व हिंदूस्थानाच्या शत्रूंचा नाश करुन धर्म व देशाच्या संरक्षणाची शपथ यावेळी शेकडो युवकांनी घेतली.

यावेळी श्रीशिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, विनोद काशिद, परमेश्वर गायकवाड, आशिष क्षीरसागर, नगरसेवक शाम नळकांडे, नरेंद्र दातीर, अमोल शिंदे, अंकुश तरवडे, निलेश चव्हाण, प्रविण कोतकर, साई भोरे, सागर होणवार, अक्षय सुकटकर, प्रकाश चौधरी आदिंसह युवक उपस्थित होते.