संस्कृती साद घालते तर वाङ्मय संवाद साधत संस्कृती समृध्द करते – डॉ. माहेश्वरी गावित 

डॉ. सहस्त्रबुध्दे लिखित वाङ्मय-संस्कृती साद-संवादाचे प्रकाशन

अहमदनगर- वाणी आणि संस्कृतीचा साद संवाद स्पष्ट करणारे हे पुस्तक वाङ्मयोपासकांना मौलिक मार्गदर्शन करते. सांस्कृतिक स्थितीगतीच्या सादाशी संवाद करीत वाङ्मय समूह मनाचा आणि माणूसपणाचा शोध घेते सांस्कृतिक संचिताच्या अरूपाचे रूप बोलीतुन मौखिक परंपरेने प्रकट होते आणि वाङ्मयातून ते लालित्यपूर्णतेने सुंदर रूप घेऊन प्रकटते समूह मनाला त्याच्याच संस्कृती संचिताचे दर्शन घडविते. या ग्रंथात वाङ्मय व संस्कृतीचा संबंध स्पष्ट होतो वाणीचे सचेतपण आकलित होते. संत वचनांची मात अर्थात संत वचनातील गुह्य उमगते. त्याचबरोबर विविध साहित्यकृतींवरील रसास्वादाने साद संवाद स्वरूप मनाला शहाणे करते. अभ्यासकांना आणि आस्वादकांना अभिरुचीसंपन्न करणारे हे पुस्तक आहे. संस्कृती सारणीत आपण समूहाने जे जगतो ते वाङ्मयात सुंदर होऊन प्रकटते हे स्पष्ट करणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ. माहेश्वरी गावित यांनी केले.

डॉ. अनिल सहस़्त्रबुध्दे लिखित वाङ्मय-संस्कृती साद-संवाद या औरंगाबादच्या चिन्मय प्रकाशनने प्रसिध्द केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रा. डॉ. लीला गोविलकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदोत्सवच्या सभागृहात झाला.

यावेळी संगमनेर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक लिंबेकर, पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष शेकडे, नगरचे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख व संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे आणि डॉ. मुसाअली बागवान यांच्या हस्ते झालेल्या प्रकाशन समारंभात पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ. माहेश्वरी गावित प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.

लीला गोविलकर म्हणाल्या आजकाल सुशिक्षित म्हणवणार्‍या लोकांनाही वाङ्मय शब्द लिहिता वाचता येत नाही अनेकवेळा तो शब्द वाडमय असा लिहितात वाचतात त्यांना पुस्तकाच्या शीर्षकातूनही शिकविण्याचे काम सहस्त्रबुद्धे यांनी केले. परमेश्वराने माणसाला वाणी दिली म्हणूनच माणूस प्रयत्नाने वाणीतून वाङ्मय कला निर्माण करून संस्कृती संचिताला चैतन्यमयी तरी वज्रलिपित करू शकला मौखिक परंपरा आणि वाङ्मय परंपरा म्हणजे संस्कृतीचा सादाशी संवाद साधण्याचा मानवाचा प्रयत्न आहे त्यातूनच त्याने युगे युगे माणूसपण जपले आहे वाङ्मय-संस्कृती साद-संवाद हे पुस्तक अभ्यासकांना एकूण वाङ्मय, संत वाङ्मय आणि साहित्यास्वाद या तीनही पातळीवर सूक्ष्म, अचूक मार्गदशन करते. याप्रसंगी गोविलकर यांनी डॉ. वाडकर यांच्या कार्याचाही गौरव केला.

प्राचार्य डॉ. डी. एस. वाडकर यांचा सेवापुर्ती निमित्त डॉ. एम. एस. बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाडकर सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, मी मोरजाईत मोठा झालो, बागवान, सहस्त्रबुद्धे यांच्या सहवासात घडलो म्हणून येथवरचा प्रवास घडला.

डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. उषा सहस्त्रबुध्दे यांनी प्रास्ताविक परिचय व सूत्रसंचालन केले प्रा. डॉ. राजु रिक्कल यांनी संयोजन केले तर प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी आभार मानले. लिंबेकर, शेकडे यांनी सहस्त्रबुध्दे यांच्यावर गौरवपर मनोगत व्यक्त केली.

ह्याप्रसंगी आनंदोत्सवच्या पु. बा. टाकळकर ग्रंथालय व संशोधन केंद्र अकोलेच्या उभारण्यासाठी डॉ. संगीता शेळके मरकड व श्री. मरकड यांनी चार कपाटाच्या स्वरूपात तर प्रा. डॉ. राजू धनगर यांनी चार खंडातील सार्थ वाल्मिकी रामायण भेट दिले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या आस्वादक, प्रकाशन व गौरव सोहळ्यास रसिक, अभ्यासक उपस्थित होते.