काय आहे हे डॉप्लर रडार?

26 जुलै 2005 रोजी जेव्हा मिठी नदीच्या पुरानं मुंबईला विळखा घातला होता तेव्हा शहरावर ढगफुटीच झाली होती. केवळ काही तासांमध्ये जवळजवळ 1000 मिलिमीटर पाऊस पडला होता. त्याच्या आधी त्सुनामीनं पूर्व किनार्‍यावर गोंधळ घातला होता. तेव्हापासून हवामानाच्या अचूक अंदाजासाठी डॉप्लर रडारची गरज असल्याचे सांगितले गेले आणि हवामान खात्याला ते उपलब्ध करून देण्याचही सरकारने ठरवल. खरोखरच काय आहे हे डॉप्लर रडार? थोडक्यात सांगायचे तर, ते डॉप्लर परिणामाचे निरीक्षण करण्याची क्षमता असलेले रडार आहे. रडारमध्ये अँटेना असतो. तो रेडिओ लहरी प्रक्षेपित करते. त्या लहरींच्या वाटेत जर एखादी वस्तू आडवी आली तर त्या वस्तूवरून त्या लहरी परावर्तित होतात आणि परत त्या अँटेनाकडे येतात. त्या लहरींचा स्वीकार करणारा रिसीव्हरही तिथंच असतो. रेडिओ लहरींच्या त्या प्रतिध्वनीवरून समोर कोणतीतरी वस्तू आहे हे समजते; पण त्या प्रतिध्वनीचा अधिक सखोल अभ्यास करून त्या वस्तूचे स्वरूप, आकारमान आणि ती स्थिर आहे की चल आहे हेही समजते. वस्तू चल असेल तर तिच्याविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी डॉप्लर परिणामाचा उपयोग होतो. आपण रेल्वे स्टेशनवर उभे असतो. दुरून एक गाडी येत असते. तिच्या शिटीचा आवाज आपल्याला ऐकू येतो. पण ती गाडी जसजशी जवळ येऊ लागते तशी त्या शिटीच्या आवाजाची पट्टी उंचावत जाते; आणि समोरून ती गाडी दूर जाऊ लागली की तीच खाली खाली येत राहाते. या आविष्कारालाच डॉप्लर परिणाम म्हणतात. जेव्हा एखाद्या स्थिर वस्तूपासून ध्वनीलहर आपल्याकडे येत असते तेव्हा त्या लहरीची तरंगलांबी स्थिर असते, पण जर ती वस्तू आपल्याकडे सरकत असेल तर ती लहर दाबली जाऊन तिची तरंगलांबी कमी कमी होत असते. कमी वेळात जास्तीत जास्त तरंग आपल्याकडे पोचतात. साहजिकच त्या लहरींची वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी वाढत जाते. तेच ती लहर आपल्यापासून दूर जात असेल तर तिची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते. यालाच डॉप्लर परिणाम म्हणतात. तरंगलांबीत किंवा फ्रिक्वेन्सीमध्ये नेमका काय आणि किती बदल झाला आहे ते अजमावल्यास ज्या चल वस्तूवरून त्या लहरी येत असतात तिच्या वेगाविषयी कोणत्या दिशेने ती धावत आहे वगैरेविषयीची माहिती आपल्याला मिळू शकते.