सरकारने पाच वर्षात टाचणी टोचेल एवढेही दु:ख जनतेला होऊ दिले नाही

राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार – माजी खा.दिलीप गांधी

अहमदनगर- केंद्र आणि राज्य सरकारने पाच वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टीने ‘चला नवा महाराष्ट्र घडवूया’ ही मोहिम भाजपने सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जेवढी आंदोलने झाली, तेवढी यापुर्वीच कधीही झाली नाहीत मात्र मुख्यमंत्र्यांना सर्व समाज संघटना आणि जनतेला टाचणी टोचेल एवढेही दु:ख होऊ न देता सर्वांचे समाधान होईल, असे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्‍वास माजी खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि राज्यातील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बळीराजापर्यंत सर्व घटकांसाठी व्यापक स्वरुपात काम केले आहे. सरकारच्या कामासंदर्भात 50 मुद्दे घेऊन जनतेच्या दारात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत पाहोचविण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सभा, रोड शो केले. जनतेशी थेट संपर्क साधला. या यात्रेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. पाच वर्षात भाजप-शिवसेना महायुतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामे, निर्णय झाले आहेत असे स्पष्ट करतानाच केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधील 370 कलम हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यावरुन असे स्पष्ट होते की, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता केवळ भाजपमध्येच आहे, असे गांधी म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध समाजघटकांना न्याय देताना मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना इतर समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली अशी अनेक कामे या पाच वर्षात वर्षात झाली असल्याने जनतेचा विश्‍वास सरकारवर बसला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार हे निश्‍चित असल्याचे गांधी म्हणाले.