दत्तप्रभूंचे आजोळ

ब्रह्मदेवांच्या चार मानसपुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्री आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षीमध्येही आहे.

साक्षात श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रींची पत्नी महासाध्वी माता अनसुया! अत्रीमुनींचं ज्ञान, तप:सामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी-देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसुया या सौंदर्यवती सुशील कन्येचा अत्रीमुनींशी विवाह लावून दिला.

‘अनसुया’ म्हणजे ‘असुयारहित’! अशा या महान सती अनसुयेचं माहेर अर्थात दत्तप्रभूंचं आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ ‘करंजी’ या गावी आहे. अगदी भर नाशिक-वणी मार्गावर वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ ३-४ कि.मी. आत हे पवित्र स्थान आहे. यालाच ‘निर्जल मठ’ असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मरकडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते.

साक्षात श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन ‘सिद्धानां कपिलो मुनी:’ असं केलंय त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे. दत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही व भारतामधून इथेच ती पाहायला मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या शिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरूप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरीशुभ्र मूर्ती ठेवलेली आहे. इथे आणखी  एक आश्चर्य असं पाहायला मिळालं की, परिसरात असलेले सगळे कुत्रे दुपारी बाराच्या आरतीला देवळाच्या गाभा-याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा