वर्षभरापूर्वी जोरदार वादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळेना

संसार उघड्यावर आलेल्या शेतकर्‍यांची जिल्हा प्रशासनाकडून केली जातेय थट्टा

अहमदनगर- नगर तालुक्यातील चास, अकोळनेर, सोनेवाडी परिसरात वर्षभरापूर्वी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसून या वादळात घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. तसेच शेतकर्‍यांच्या फळ बागांचे मोठे नुकसान होऊन अनेक पॉलिहाऊस उद्ध्वस्त झाले होते. या घटनेला वर्ष उलटले तरी अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाने या शेतकर्‍यांना 1 रुपयाही नुकसान भरपाई न देता या शेतकर्‍यांची थट्टा चालवली आहे. त्यामुळे वादळग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चास तसेच अकोळनेर गावच्या परिसरात दि.31 मे 2018 रोजी सायंकाळी अचानक वादळ सुरू झाले. विजांच्या कडकडाटासह सुसाट्याचा वारा सुटला. जोरदार पाऊसही सुरू झाला. यावेळी वादळ एवढे प्रचंड होते की, अनेक घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे लोखंडी अँगलसह 100 ते 200 फुटांपेक्षा लांब जाऊन पडले होते. चास गावच्या परिसरातील विठ्ठल लक्ष्मण गोंडाळ, भाऊसाहेब किसन रासकर, अजय पंढरीनाथ रासकर, सुखदेव लक्ष्मण गुंजाळ, रामदास आमले, राजाराम आमले, आबासाहेब लक्ष्मण गुंजाळ, भाऊसाहेब लक्ष्मण गुंजाळ, मारुती दत्तात्रय गुंजाळ, बबन किसन कारले आदींच्या घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून तसेच भिंती कोसळून मोठे नुकसान झाले होते.

अकोळनेर गावाजवळील शाळेच्या मागील बाजूस असलेल्या मारुती बापूराव भोर, सोनेवाडी रोडवर बापूसाहेब नाना भोर, ज्ञानदेव महादू भोर, कविता सतीश भोर, कोळगेवाडी येथील सहादू नामदेव कोळगे, रेल्वे स्टेशन परिसरातील सात मोर्या जवळील पंढरीनाथ महादू उमाप, एम.आय.डी.सी. भागातील भाऊसाहेब गिताजी जाधव, भाऊसाहेब नामदेव जाधव आदींच्या घरांचे पत्रे, जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे वादळात उडून गेले व या सर्व गोरगरीब शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर आले होते.

तसेच अकोळनेर रेल्वे स्टेशन परिसरातील अरुण अनंत भोर, भाऊसाहेब महादू भोर, शहाजी शिवराम भोर यांचे पॉलिहाऊस शेड उडाल्याने मोठे नुकसान होते. पॉलिहाऊसमधील हाताशी आलेल्या विविध पिकाचे मोठे नुकसान झाले. पॉलिहाऊस धारक शेतकर्‍यांचे जास्तीतजास्त 30 ते 40 लाख व कमीत-कमी दहा लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र भरपाई 1 वर्ष उलटले तरी मिळाली नाही. त्यामुळे या वादळग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेच का गतिमान प्रशासन

वादळाच्या या अस्मानी संकटामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. या नुकसानीचे पंचनामे करण्याची तत्परता प्रशासनाने दाखविली व तातडीने पंचनामे केले. त्यामुळे शासनाकडून नुकसान ग्रस्तांना तातडीने भरपाई मिळेल अशी आशा होती. मात्र जनतेच्या मदतीसाठी तत्पर शासन, गतिमान प्रशासन अशा जाहिरातींचा मारा करणार्‍या शासनाकडून वर्ष उलटले तरीही वादळग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळाल्याने हेच का गतिमान प्रशासन असा सवाल उपस्थित होत आहे. अतिशय कार्यतत्पर आणि कर्तव्य दक्ष असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच या प्रश्नी लक्ष घालून या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा