अहमदनगर- समाजासाठी कार्य करणार्या डाळमंडई फौंडेशन व तरुण मंडळाच्या कार्याचा आदर्श घेवून युवकांनी कार्य केले पाहिजे असे मत आ. अरुण जगताप यांनी व्यक्त केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञान हि काळाची गरज असून त्याचा योग्य वापर करून त्याला देखाव्यांचे रुप देण्याचा डाळमंडई तरुण मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद असून नगर जिल्यातील गणेश भक्तांना हा देखावा कायम स्मरणात राहील असेही ते म्हणाले.
डाळमंडई तरुण मंडळाच्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या आकर्षक थ्रीडी वॉल देखाव्याचे उद्घाटन आ. अरुण जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आडते बाजार मर्चंट असो.चे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील लोक, डाळमंडई फौंडेशन व तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणपतीची आरती करण्यात आली.
नगरमध्ये गणेशोत्सव व सामाजिक उपक्रम राबविणार्या डाळमंडई फौंडेशन ट्रस्टच्या डाळमंडई तरुण मंडळातर्फे यंदा लालबागचा राजाच्या धर्तीवर थ्रीडी वॉंलची आकर्षक सजावट केली आहे. बदलते युग व बदलते तंत्रज्ञान वापरून एकाच ठिकाणी चंद्रयान मोहीम, निसर्ग, राजमहल, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती धर्मनिरपेक्षता, संस्कृती, परंपरा, विज्ञान, पर्यावरण, आदी शंभर पेक्षा जास्त संदेशपर स्वरूपात देखावे गणेशभक्तांना थ्रीडी स्वरुपात पाहण्यास मिळणार आहेत. नगरचे शांती ऑडीओचे राजू ढोरे यांनी या देखाव्याची उभारणी केली आहे.