कावळा आणि कबूतर

एका रस्त्यावर औदुंबराचे एक झाड होते. त्या झाडावर एक कावळा आणि एक कबूतर राहात होते. असेच दिवस चालले होते. एकदा कडक उन्हाळा पडला. तेव्हा कावळा आणि कबूतर दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी झाडाच्या पानात आडोशाला बसले होते. त्यावेळी त्या रस्त्याने एक वाटसरू चालला होता. कडकडीत उन्हाने घामाघूम होत चालून-चालून तो थकला होता. हे औदुंबराचे झाड दिसताच तेथेच आराम करावा; म्हणून तो झाडाखाली बसला. जवळची शिदोरी सोडून त्याने भोजन केले व तेथेच जरा आडवा पडून झोपी गेला. काही वेळाने सूर्य पुढे सरकल्याने झाडाची सावली बाजूला गेली, त्या सरशी त्या वाटसरूच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला.

झाडावर बसलेल्या कबुतराने हे पाहिले. त्याला वाटसरूची कणव आली. तो मनाने प्रेमळ आणि सज्जन होता. त्याने आपले पंख पसरले आणि त्या वाटसरूच्या तोंडावर आपली सावली पडेल, असा तो बसला. त्यामुळे वाटसरूला शांतपणे झोप लागली; पण झोपेत त्याचे तोंड मात्र उघडे पडले. कावळा हे सारे पाहत होता. दुष्ट स्वभावाच्या कावळ्याला वाटसरूचे हे सुख पाहावले नाही. कबुतराच्या सत्कार्याचा त्याला मनातून रागच आला. त्याच्या दुष्टपणाने उचल खाल्ली. त्याने वाटसरूच्या उघड्या पडलेल्या तोंडात आपली विष्ठा टाकली व लगेच तेथून पळून गेला.

बिचार्‍या कबुतराला कावळ्याचा हा कावा समजला नाही. तो पंख पसरून वाटसरूवर सावली धरून होता. तोंडात विष्ठा पडताच वाटसरू झोपेतून जागा झाला. तो फारच संतापला होता. इकडे-तिकडे पाहत त्याने वर पाहिले असता कबूतर पंख पसरून त्याच्या फांदीवर बसलेले दिसले. त्याला वाटले, या कबुतरानेच आपल्या तोंडात विष्ठा टाकली. त्याने जवळ पडलेला एक धोंडा उचलून रागाने कबुतराकडे भिरकावला. तो नेमका कबुतराच्या वर्मी लागला. वर्मी घाव बसताच तो मरून खाली पडला.

तात्पर्य : यात बिचार्‍या कबुतराचा काही सुद्धा दोष नव्हता. दुष्टाची संगत केल्याने त्याच्या प्राणावर बेतले.