जप करताना मन एकाग्र होत नाही?

ब-याच गुरुभक्तांनी, साधना किंवा नामजप करताना, मन एकाग्र न होता इकडे-तिकडे भटकत असते, तरी यावर उपाय काय? अशी विचारणा याठिकाणी केल्याचे आढळते. या संबंधाने श्री उपासनी महाराज, साकुरी (शिर्डी) यांनी त्यांच्या प्रवचनात केलेले विवेचन संकलित करून खाली दिले आहे.

कोणतेही परमेश्वरी कृत्य करीत असता, मन इकडे तिकडे भटकत असते, त्यामुळे करत असलेल्या जप जाप्य इ. कडे लक्ष लागत नाही, अशी काही भक्त तक्रार करतात. त्यांना मी जे उत्तर देतो, ते तुम्हाला सांगतो.

देवाचे सत्कर्म करीत असता, मन भटकते तर भटकू द्या. ते स्थिर होण्याची गरजच नाही, कारण चित्त स्थिर होणे हे सत्कृत्याचे अंतिम फळ आहे. अगोदर सत्क्रिया पूर्ण होत नाही आणि त्याच्या अंतिम फळाची कशी इच्छा धरता? मन भटकले तर, त्याच्यात नुकसान काही नाही. कारण, मन कोठेही भटकत असले तरी, आपला फायदा होतो. तो कसा ते पाहा.

सत्कर्माचे वेळी ते कृत्य करीत असता, आपले मन एका ठिकाणीच असल्याचाही अनुभव येतो व चांगल्या-वाईट ठिकाणी भटकत असते, हाही अनुभव येतो, पण या दोन्ही प्रकारच्या अनुभवापासून सत्कर्मात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. मनाचा स्वभावच असा आहे की, एक काम शरीराच्या द्वारे करीत असता, दुसरीही मानसिक कामे त्याच वेळी ते करते. म्हणजे, एकीकडे पठण करणे, हाताने माळ ओढणे किंवा अभिषेक करणे इ. शारीरिक रीतीने ते सत्कर्म सुरू झाले की, मन काही घरगुती, परिवारापैकी, उद्योगधंद्याविषयी किंवा शत्रू-मित्रांविषयी विचार करू लागते, पण अशावेळी मन इकडे तिकडे जात असले, तरी आपले सत्कर्म चालूच असते, ते बंद पडत नाही. उलट ते कोठेही भटकत असले तरी पटदिशी मधूनमधून आपले सुरू असलेले सत्कर्म बरोबर चालले आहे की नाही, हे पाहण्यासाठी येतच असते, हाही अनुभव आपल्याला येतच असतो.

मनाच्या अशा भटकण्याचा आपल्याला फायदा असा होतो की, मन सत्कर्माच्या वेळी इकडे तिकडे जात असताना, ते सत्कर्मामधील पुण्यांश बरोबर घेऊन जात असते. त्यामुळे ते जितक्या ठिकाणी जाते, ती ठिकाणे त्या पुण्यांशाने पवित्र होत जातात. म्हणजेच जर मन सत्कर्माचे वेळी आपल्या शत्रूकडे गेले, तर त्या शत्रूचे आपल्या ठिकाणी असलेले शत्रुत्व कमी होत जाते. तसेच जर ते मन भटकत असताना एखाद्या वाईट ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणाचा दोष कमी होऊन त्या ठिकाणाची पवित्रता वाढते.

याप्रमाणे सत्कर्माच्या पुण्यांशाने मनाची बहुतेक ठिकाणे पावन होत आली, म्हणजे त्याचे भटकण्याचे काम आपोआप बंद पडून आपल्या ठिकाणी आपोआप परत येते आणि बºयाच दिवसांनी अशी सर्व ठिकाणे पवित्र झाल्याचाही अनुभव आपल्याला येतो.