शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था, नगरसेवक करणार ठिय्या आंदोलन

कानडे मळा, कोंबडीवाला मळा रस्त्याच्या दुरुवस्थेबाबत नगरसेवक अविनाश घुले यांचा इशारा

अहमदनगर- गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने नगर शहरातील सर्वच रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली, परंतु अजूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावे लागत आहे. प्रभाग क्र. 11 मधील प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असून, त्यामध्ये पाणी साचून ते आणखी मोठे होत आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना पाठिचे, मणक्याचे आजार होत आहेत व गाड्यांचेही नुकसान होत आहे. येत्या आठ दिवसात या रस्त्यांची कामे न झाल्यास परिसरातील नागरिकांसह मनपामध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेवक अविनाश घुले व मुजाहिद कुरेशी यांनी दिला आहे.

नगरसेवक अविनाश घुले यांनी प्रभाग 11 मधील कोंबडीवाला मळा, कानडे मळा, महावितरण कार्यालयामागील परिसर आदि परिसरात नागरिकांसह रस्त्याच्या झालेल्या दुरुवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी नामदेव मोढवे, मोहन दहिफळे, अरुण गाडळकर, मिलिंद कानडे, संजय कानडे, दिपक सांगळे, राजेंद्र पुंड, संदिप शिंदे, दुर्गेश सानप, स्वामी हजारे, राहुल गाडळकर, नितीन बोरुडे, अनिल हराळे आदि उपस्थित होते.

या भागात शाळा, मंगल कार्यालय व नागरिकांची मोठी वसाहत असल्याने सोलापूर रोड मार्गे नगरमध्ये येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणावर आहे. शाळेमध्ये येणार्‍या विद्यार्थी व पालकांची संख्याही मोठी असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

याप्रसंगी प्रत्येक भागातील नागरिकांनी नगरसेवक अविनाश घुले यांच्यासमोर रस्त्याच्या दुरावस्थेबाबतची व्यथा मांडली. काही ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी गेल्या 3-4 महिन्यांपासून आणलेली खडी तशीच पडून आहे. ती पसरविण्याची तसदी सुद्धा प्रशासनाने घेतली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी सचिन सुंबे, सचिन रासकर, गोरख भदर, रवी पोटे, अमोल पोटे, बाळासाहेब शिंदे, कैलास बोरुडे, संतोष रासकर आदि नागरिक यावेळी उपस्थित होते.