नगर जिल्ह्यात यंदा पावसाने मोडला 40 वर्षांचा विक्रम

सरासरी 810 मि.मी. पावसाची नोंद; नोव्हेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची पहिलीच वेळ

अहमदनगर- मागील वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणा-या नगर जिल्ह्यावर यंदा पावसाने पुरे आता असे म्हणण्याची वेळ आणली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने मोडला 40 वर्षांचा विक्रम मोडला असून यावर्षी सरासरी 810 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ही जोरदार पाऊस होण्याची पहिलीच वेळ असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या नोंदीवरून दिसून येत आहे.

महाराष्ट्रात नगर जिल्हा प्रामुख्याने अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जिल्हयाचे पर्जन्यमान अनिश्चित स्वरुपाचे असून पर्जन्याची वाटणी असमान आहे. अकोले व संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील सरासरी पर्जन्यमान इतर तालुक्यापेक्षा जास्त असते. पण तेही नियमित नाही. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या गेल्या 40 वर्षातील पावसाच्या नोंदीनुसार दोन वर्षापूर्वी सन 2017 मध्ये जिल्ह्यात सरासरी 803 मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी 1981 पासूनचा हा सर्वाधिक पाऊस होता. त्या पावसाचा विक्रम यंदा मोडला गेला असून 1 जून पासून 7 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 810 मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला आहे.

दरम्यान या जास्तीच्या पावसाने नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कधीही न भरणारी धरणे ही सध्या ओसंडून वाहत असून लहान-मोठे तलाव तर यापुर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे ही धरणे यंदाच्या पावसाळ्यात दोन पेक्षा अधिक वेळा ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा नदीपात्रात सातत्याने विसर्ग केला जात आहे. तर दक्षिण भागातील मांडओहळ धरण ही यंदा ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाण्यासाठी कायम आसुसलेले धाटशीळ धरणातील पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला असून सीना धरण आतापर्यंत 80 टक्के भरले आहे. कायम मृतपाणी साठा असणा-या खैरी प्रकल्पात यंदा 34 टक्के पाणीसाठा झाला आहे. अवकाळीचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास ही धरणेही ओसंडून वाहू शकतात.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 163 टक्के पाऊस

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 162.86 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी अवघा 71.19 टक्के पाऊस झाला होता. यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 11339.8 मि.मि. पाऊस झाला असून सर्वाधिक 1545 मि.मि. पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस कर्जत तालुक्यात 601.5 मि.मि. झाला आहे. नगरमध्ये एकूण 777 मि.मि. पाऊस कोसळला असून सरासरीच्या तो 148.20 टक्के आहे.

नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये विहिरी, ओढे, नाले, तलाव अद्याप कोरडेच

जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असली तरी अजूनही काही भागात मोठ्या पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. अनेक भागात भीज पाऊस झाला. जमीनीची पाणी पातळीही वाढली मात्र मोठा पाऊस न झाल्याने ओढे, नाले, तलाव कोरडे ठाक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अजुनही दमदार पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर यंदाचा खरीप हंगामही पावसाअभावी वाया गेला. आता भीज पावसावर रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी पाणी टंचाईची समस्या लवकरच भेडसावण्याची चिन्हे आहेत. नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे चित्र सध्या दिसत आहे.