अहमदनगर जिल्ह्यात येत्या 2 दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गारपीटीची शक्यता

अहमदनगर – राज्यभरात परतीचा पाऊस सध्या जोरदार बरसत आहे, मंगळवारी (दि.8) विजयादशमीला पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र येत्या दोन दिवसांत नगर जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

यावर्षी पावसाळ्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस बर्‍यापैकी बरसला होता. तर दक्षिण नगर जिल्ह्यातील भागाला पावसाळा संपल्यावरही दमदार पावसाची प्रतिक्षा होती. गेल्या आठवडा भरापासून परतीच्या पावसाने याभागात चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील आठवडाभर दक्षिण जिल्ह्यात बहुतांशी भागात दमदार पाऊस बरसला. विजयादशमीला पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता बुधवारी (दि.9) दुपारनंतर पुढील तीन दिवस राज्यातील नगरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या परिसरात पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

गारांसह वादळी पावसाने फळबागांचे नुकसान

सोमवारी (दि.7) रात्री 7 च्या सुमारास खडकी आणि परिसराला वादळी वार्‍यासह गारांच्या पावसाचा तडाखा बसला. खडकीतील 50 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

खडकीसह, बाबूर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, जाधववाडी या भागात संत्रा फळबागांचे प्रमाण मोठे आहे. एकट्या खडकीमध्ये 100 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग लागवड आहे. मागील वर्षीच्या कडक दुष्काळातही टँकरने पाणी घालून कसे-बसे फळबागा जगवल्या आहेत. त्यासाठी एकरी दीड ते दोन लाख खर्च केलेला आहे. अद्यापही पाऊस पुरेसा नसल्याने टँकर सुरूच आहेत. त्यातच सोमवारी संध्याकाळी 7 वाजता गारांसह वादळी पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात फळे गळाली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.

पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

दुष्काळी परिस्थिती असताना टँकरने पाणी घालून फळबागा जगवल्या. अजूनही पाऊस पुरेसा नाही त्यामुळे अजूनही टँकर सुरू आहेत. लाखो रुपये पाण्यावर खर्च झाला आहे आणि त्यात गारांचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात फळे गळाली. खूप मोठे नुकसान आले आहे, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खडकी येथील शेतकरी भारत निकम यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा