ऐन सणासुदीच्या काळात शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरुच

वीजपुरवठा वारंवार होतोय खंडित ; महावितरण विरोधात नागरिकांचा संताप

अहमदनगर – नगर शहरासह ग्रामीण भागात ऐन सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. तसेच अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. महावितरणने ऐन सणासुदीच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

नवरात्रोत्सव नुकताच पार पडला आहे. या उत्सव काळातही सातत्याने वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होत होता. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मंगळवारी (दि.8) तर विजयादशमीच्या दिवशीही शहराच्या अनेक भागात वीज गायब झालेली होती. गेल्या 2 दिवसांपासून पावसानेही विश्रांती घेतलेली असताना विजेचा लपंडाव सुरु असल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दसर्‍यानंतर आता सर्वांना दिवाळी सणाचे वेध लागलेले आहेत. दिवाळी सणाची तयारी सुरु आहे, अशातच वारंवार खंडित होणार्‍या विजेच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नगर शहर परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. रात्री अपरात्री कोणत्याही वेळेत विजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी शहरातील सर्वच परिसरातून येत आहेत. महावितरणकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने रहिवाशी संभ्रमात असून वीज वाहिन्यांवरील भार वाढल्याने पुरवठा खंडित होत असल्याचे कारण दिले जात आहे.

उकाड्यामुळे शहरवासीय हैराण

अलिकडे वीज बिलांची सक्तीने वसुली केली जाते, त्याच पद्धतीने महावितरणने ग्राहकांना सुविधाही दिल्या पाहिजे. मागील आठ-दहा दिवसांपासून शहरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. यासंदर्भात कल्पना देण्यासाठी ग्राहकांनी दूरध्वनी केला, तर अधिकारी कर्मचारी समोरून प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्यावेळी नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी बंद करून ठेवले जातात. एकीकडे ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे आवाहन महावितरणचे वरिष्ठ अधिकारी करतात, तर दुसरीकडे त्यांच्या आवाहनाला त्यांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांकडून हरताळ फासला जात असल्याचे विदारक चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहर परिसरात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढलेली असल्याने उकाड्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

अधिकारी कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे

विद्युतपुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे संपर्क साधला, तर लोड वाढला आहे असे उत्तर देऊन ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे अनेक ठिकाणी घरातील फ्रीज, पंखे, टीव्ही आदींसह अन्य उपकरणे जळण्याच्या घटना घडत आहेत, त्यास जबाबदार कोण, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. रात्री- बेरात्री वीज गेल्यास नागरिकांना उकाड्यातच रात्र काढावी लागते.

हेच का अच्छे दिन….

सध्या शहरात सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झालेले असताना राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांना मात्र याकडे पाहायला वेळ नाही सर्वजण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे महावितरणचे अधिकारी – कर्मचारीही बिनधास्त आहेत. त्यांनाही जनतेच्या त्रासाचे काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. ऐन सणासुदीच्या काळात जर विजेचा असा खेळखंडोबा सुरु असेल तर हेच का सरकारचे अच्छे दिन? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.