शहराचा वीजपुरवठा 24 तासात सुरळीत करा अन्यथा सोमवारी मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा; महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन

नगर- नगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा येत्या 24 तासांच्या आत सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.17) आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, प्रा. अरविंद शिंदे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा. सिताराम काकडे, शिवा कराळे, अॅड. गजेंद्र दांगट, विशाल शिंदे, सागर गुंजाळ, शशिकांत गायकवाड, नाझीर शेख, लाला खान, अमित अवसरकर, संतोष ढाकणे आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकार्‍यांची शुक्रवारी (दि.14) दुपारी भेट घेवून निवेदन देत चर्चा केली.

या निवेदनात म्हंटले आहे की, सोमवारी (दि.10) नगर शहरामध्ये झालेल्या पावसानंतर शहरातील बर्‍याच भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे शहरामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये वीज नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या वातावरणा मध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे व त्यातच वीज पुरवठा बंद असल्यामुळे घरातील फैन, कुलर चालत नसल्यामुळे नागरिकांचा जीव उष्णतेमुळे कासावीस होत आहे. त्यामुळे संपूर्ण रात्र शहरातील नागरिकांना जागे राहून काढावी लागत आहे. त्याचप्रमाणे वीज पुरवठा खंडित असल्यामुळे दुकानदारांचे फ्रिज बंद असल्यामुळे त्यांच्या मालाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शहरावर निर्जळीचेही संकट आलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील बर्‍याच भागामध्ये वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. याचाच अर्थ महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना अतोनात हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. तसेच महावितरणच्या कर्मचार्‍यांच्या गलथान कारभारामुळे गुरुवारी (दि.13) पोलीस हेडक्वॉर्टसमध्ये तरुणीला जीव गमवावा लागला. याबाबत कारवाई केली जावी.

येत्या 24 तासामध्ये शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.17) तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.