तब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार

अहमदनगर – ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याचे तब्बल अडीच वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही डांबरीकरण न झाल्याच्या निषेधार्थ या भागातील नागरिकांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत शहरातील घुमरे गल्ली, तख्ती दरवाजा ते शनिचौक या परिसरातील सुमारे 250 ते 300 नागरिकांनी सह्यांचे जाहिर निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा घेतलेला हा निर्णय कोणाच्याही दडपणाला बळी न पडता या रस्त्यांवरून वहातुक करणारे पादचारी, वाहन चालक व रहिवाश्यांच्या हितासाठी घेतला आहे. या निर्णयावर आम्ही विधानसभा मतदान संपेपर्यत ठाम राहणार असून कितीही दडपण व आश्वासने देण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी आता माघार नाही असे या निवेदनाद्वारे आम्ही जाहिर करीत आहोत.

शहरातील बहुतेक रस्त्यांवर (गल्ली, बोळे सुध्दा) हिच परिस्थिती असून राज्यात नगर शहराची खड्डेयुक्त शहर अशी ओळख झाली आहे. फक्त घुमरेगल्ली, तख्ती दरवाजा ते शनिचौक हेच रस्ते नाहीत तर शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे तसेच गल्ली, बोळातील रस्तेही सिमेंट क्रॉकिंटचे चांगले व्हावेत हीच मागणी या जाहीर निवेदनाद्वारे करीत आहोत. असेही या नागरिकांनी म्हटले आहे.

शहरातील गल्लीबोळातील उद्ध्वस्त रस्त्यांसाठी सर्वपक्षीय नगरसेवक पोटतिडकीने कधी भांडणार

शरण मार्केटमधील गाळेधारकांचे दोन महिन्यात पुर्नवसन करण्याचे महापौरांनी दिलेले आश्वासन व त्याचबरोबर या गरीब व्यावसायिक व हातावर पोट असल्याने त्यांच्या पुनर्वसनाची मागणी मनपा महासभेत रेटणार्‍या सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक अभिनंदनास पात्र आहेत. मात्र हे नगरसेवक शहरातील प्रमुख व गल्लीबोळातील उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांसाठी एवढे पोटतिडकीने का नाही भांडत? असा सवाल ग्राहक संघाचे अध्यक्ष शिरीष बापट यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेकडे त्यांचे होणारे दुर्लक्षाचे प्रमुख कारण आपल्या नगरकरांच्या लक्षात येत नाही असे वाटते. कारण तुमच्या प्रश्नात उपद्रवमुल्य दडलेले पाहिजे आणि दुसरे म्हणजे तुम्ही संघटीत पाहिजे तरच तुमच्या प्रश्नाकडे राजकीय पक्षांचे व अधिकार्‍यांचे लक्ष जाते. रस्त्यांच्या प्रश्नावर गाळेधारकांसारखे किती लोक रस्त्यावर येतील हा प्रश्न आपणच स्वत:ला अंतर्मुख होऊन विचारला पाहिजे.

नगरकरांमध्ये उपद्रवमूल्य निर्माण करण्याएवढी ताकद असती तर आज जसे शरण मार्केट पडल्याबरोबर चार दिवसात महासभेत हा प्रश्न नगरसेवक उपस्थित करतात व कमीतकमी आश्वासन तरी पदरात पाडून घेतात. तसेच नगर शहरातील नागरिकांनाही करता आले असते. शहरातील रस्ते, अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे, वहातुक व्यवस्था हे प्रश्न तडीस नेणारे असे किती नगरसेवक आहेत हाच एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे नगरकरांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याची गरज आहे, असेही बापट यांनी म्हंटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा