शिधापत्रिकां संदर्भातील कामांसाठी नागरिकांचे ‘अन्नधान्य’ मध्ये हेलपाटे

भिंगारमध्ये ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत तक्रारी सोडवाव्यात

अहमदनगर- शिधापत्रिकेसंदर्भातील विविध कामांसाठी भिंगार छावणी परिषद क्षेत्रातील नागरिकांना अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी नागरिकांच्या सोयीसाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम भिंगार शहरात राबवून तक्रारी दूर कराव्यात अशी मागणी भिंगार भाजपने केली आहे.

यासंदर्भात भिंगार भाजपचे चिटणीस वसंत राठोड यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, भिंगार कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील अनेक रहिवाश्यांकडे शिधापत्रिका नाहीत किंवा त्यांना विभक्त करावयाच्या आहेत किंवा शिधापत्रिकेतील नावे कमी करणे किंवा वाढवण्यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. शिवाय या कारणास्तव त्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. तरी ‘शासन आपल्यासाठी’ या उपक्रमांअंतर्गत शिधापत्रिकेसंदर्भात सर्व तक्रारी दुर करण्यासाठी पाच ते सात दिवसांचे एक शिबीर भिंगार शहरात घ्यावे. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास सर्व कार्यकर्ते तयार असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.