केडगावसाठी शुक्रवारपासून सुरू होणार शहर बससेवा

तीन नवीन बस गाड्या दाखल; भिंगारलाही लवकरच सेवा

केडगाव ते निर्मलनगर मार्गावर धावणार बसेस

केडगावला बस सेवा शुक्रवारी (दि.6) सकाळी 6 वाजेपासून सुरु होणार आहे. ही बस केडगावच्या शाहूनगर येथून निघून नगर शहरातील बसस्थानक ते निर्मलनगर पर्यंत धावणार आहे. तसेच निर्मलनगरहून पुन्हा बसस्थानक ते शाहूनगर अशी सेवा राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर एकूण सात बसगाड्या सेवा देणार असून दर 15 मिनिटाला शाहूनगर तसेच निर्मलनगर येथून या गाड्या सुटणार आहेत. त्यामुळे केडगावहून सावेडी उपनगरात तसेच सावेडी उपनगरातून थेट केडगावला जाणार्‍या नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे प्रा. गाडे यांनी सांगितले. बस गाड्यांच्या ताफ्यात आणखी तीन नव्या गाड्या लवकरच दाखल होणार असून त्या दाखल होताच भिंगार मार्गावरील बस सेवाही सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर- शहरात महापालिकेच्यावतीने खासगीकरणातून शहर बस सेवा चालविणार मे. दिपाली ट्रान्सपोर्ट संस्थेने आणखी तीन नव्या बस गाड्या खरेदी केल्या असून केडगावच्या शाहूनगर पर्यंत शुक्रवार (दि.6) पासून बस सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली. शहरात दिपाली ट्रान्सपोर्टच्या वतीने गेल्या सात-आठ महिन्यांपासून शहर बस सेवा चालविली जात आहे. प्रारंभी आठ बस गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यात तीन गाड्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या निंबळक 2, विळदघाट इंजिनिअरींग कॉलेज 5 व निर्मलनगर 4 या मार्गावर बसेस चालविल्या जात होत्या. त्यात आणखी तीन गाड्यांची भर पडली असून आता एकूण 14 गाड्या झाल्या आहेत. यात तीन वाढीव गाड्यांमुळे केडगावची बससेवा सुरू केली जाणार आहे.