भाजपा सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहचवावी – भाजपाचे संघटन सरचिटणीस विजय पुरोहित

अहमदनगर – महिलांच्या माध्यमातून सुप्त लाट निर्माण करण्यासाठी भाजपाने ‘रक्षाबंधन पर्व’ उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना प्रत्येक घरातून राखी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या राखीच्या पाकिटात महिलांसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली गेली आहे. योजनांचा लाभ मिळाला असल्यास त्याबद्दलची प्रतिक्रियाही कळावयाची आहे. राखी पाठविणार्‍या महिलांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यायचा आहे, त्यानंतर या महिलेच्या मोबाईलवर मुख्यमंत्र्यांचा संदेश ऐकू येणार आहे. या उपक्रमामुळे मुख्यमंत्र्याबद्दल पर्यायाने भाजपाबद्दल आपुलकी निर्माण होणार आहे. यासाठी महिला आघाडीच्या पदाधिकारी व भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी नियोजन करावे. प्रत्येक बूथ प्रमुखांकडे सरकारी योजनांची माहिती देणारी पुस्तिका देण्यात आली आहे, ती त्याने घरोघरी पोहचवायची आहे, असे प्रतिपादन भाजपाचे संघटन सरचिटणीस विजय पुरोहित यांनी केले.

भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख व विस्तारकांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना विजय पुरोहित बोलत होते. याप्रसंगी माजी आ.चंद्रशेखर कदम, आ. मोनिका राजळे, आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे, कार्य.सदस्य अॅड. अभय आगरकर, उपमहापौर मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, प्रकाश चित्ते आदि उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनुकूलतेसाठी महिलांच्या माध्यमातून सुप्त लाट निर्माण करण्याचा निर्णय पक्षाच्या शक्तीकेंद्र प्रमुख व विस्तारकांच्या नगरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी मतदार संघनिहास बुथ संमेलने घेतली जाणार आहे, त्याची जबाबदारी पक्षाचे प्रदेश राष्ट्रीय पदाधिकारी श्याम जाजू व प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निष्क्रिय विस्तारक बदलून तेथे नवीन विस्तारक नियुक्त करण्याचा निर्णयाही संघटन सरचिटणीस विजय पुरोहित यांनी बैठकीत जाहीर केला.

पुढे बोलतांना विजय पुरोहित म्हणाले, मतदार संघनिहाय बुथ संमेलने 18 ते 19 ऑगस्टला घेतली जाणार आहेत. उत्तर जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रीय पदाधिकारी श्याम जाजू यांच्याकडे तर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पदाधिकार्‍यांनी नवीन नोंदणी झालेल्या मतदारांपर्यंत पक्षाचे काम पोहोचवायचे आहे. गावातील कोणत्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कोण, त्यांचे मोबाईल क्रमांक, त्यांच्या ताब्यातील संस्था याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही यावेळी पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या.

याप्रसंगी अॅड. अभय आगरकर म्हणाले, सत्ता येताच पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होते, त्याचा फटका इतर पक्षांना बसला, मात्र सत्ता प्राप्त होऊनही भाजपने पक्ष संघटनेकडे लक्ष दिले, त्यामुळेच केंद्रात स्वबळावर सत्ता मिळाली, तीच पद्धत राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात राबवयाची आहे, मात्र तरीही कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन श्याम पिंपळे यांनी केले तर आभार प्रसाद ढोकरीकर यांनी मानले.