लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता भिंगार छावणी मंडळाच्या निवडणुकीचे वेध

जानेवारीत संपणार विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ; प्रशासनाला निवडणूक विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा

अहमदनगर – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता भिंगार छावणी मंडळाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मंडळाच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाल जानेवारीच्या सुरुवातीला संपणार आहे. त्यापुर्वी निवडणूक होणे अपेक्षित असल्याने छावणी मंडळ प्रशासनालाही निवडणूक विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. राजकीय वर्तुळातही याबाबत उत्सुकता आहे.

केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या अखत्यारित असलेल्या भिंगार छावणी मंडळ (कॅन्टोन्मेट बोर्ड) एकुण 14 सदस्यांचे आहे. यामध्ये लष्करातील 5 सदस्य हे पदसिद्ध असतात. याशिवाय मंडळाचे अध्यक्ष हे ब्रिगेडीयर असतात. तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे संरक्षण विभाग नियुक्त असतात. उर्वरित 7 सदस्य जनतेमधुन सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडले जातात. या जनतेतून निवडलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याला उपाध्यक्ष पदाची संधी मिळते. छावणी मंडळाच्या निवडणुका पुर्वी मुक्त चिन्हांवर लढविल्या जात असत. निवडणुकीसाठी कुठल्याही राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर होत नव्हता. मात्र 18 मे 2008 रोजी झालेली छावणी मंडळाची निवडणूक ही पहिल्यांदाच राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविली गेली होती. त्यानंतर 11 जानेवारी 2015 रोजी दुसर्‍यांदा पक्षचिन्हावर निवडणूक झाली. 2008 मध्ये निवडून आलेल्या सदस्य मंडळाची मुदत मे 2013 मध्ये संपली होती.

मात्र संरक्षण खात्याने तत्कालिन सदस्य मंडळाला दोनवेळा सहा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे त्या सदस्य मंडळास 1 वर्षाचा वाढीव कालावधी मिळाला होता. ती मुदतही जून 2014 मध्ये संपल्यानंतर छावणी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष असलेले ब्रिगेडीयर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सहा महिने छावणी मंडळाचा कारभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर 11 जानेवारी 2015 रोजी निवडणूक होवून नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आले होते.

सलग दोनवेळा हुकली शिवसेनेची उपाध्यक्षपदाची संधी

2008 मध्ये पहिल्यांदा राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढविली गेल्यानंतर त्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या होत्या तर एक अपक्ष सदस्य निवडूण आला होता. त्यावेळी शिवसेनेचे स्मिता अष्टेकर, विष्णू घुले, प्रकाश फुलारी तर काँग्रेसचे कलिम शेख, सुनिल उर्फ बाळासाहेब पतके, विजय भिंगारदिवे हे सदस्य म्हणून निवडून आले होते. शाहीन शेख या अपक्ष सदस्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने अपक्ष शाहीन शेख यांना बरोबर घेत छावणी मंडळात सत्ता मिळविली होती. व काँग्रेसचे कलिम शेख उपाध्यक्ष झाले होते.

2015 च्या निवडणुकीतही शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 3 व भाजपाचे 1 असे संख्याबळ होते. मिना मेहतानी, कलिम शेख, मुसद्दीक सय्यद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर तर रविंद्र लालबोंद्रे, प्रकाश फुलारी, संजय छजलानी हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. भाजपाच्या चिन्हावर शुभांगी साठे यांनी विजय मिळविला होता. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपाची युती असताना सुद्धा छावणी मंडळाच्या निवडणुकीत मात्र युतीत ताटातुट झाली होती. ती ताटातुट निकालानंतरही कायम राहिली आणि भाजपाच्या शुभांगी साठे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे मुसद्दीक सय्यद उपाध्यक्ष झाले होते. त्यामुळे शिवसेनेची उपाध्यक्षपदाची संधी सलग दुसर्‍यांदा हुकली होती.

मुदतवाढ की निवडणूक याबाबत उत्सुकता

2008 मध्ये अस्तित्वात आलेल्या सदस्य मंडळास केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याने दोनदा सहासहा महिन्यांची मुदतवाढ दिल्याने त्या सदस्य मंडळास 1 वर्ष वाढीव कालावधी मिळाला होता. विद्यमान सदस्य मंडळाची मुदत जानेवारीच्या सुरुवातीला संपणार आहे. त्यामुळे मागील वेळीप्रमाणे विद्यमान सदस्य मंडळास मुदतवाढ मिळणार की निर्धारित कालावधित निवडणूक होणार याबाबत उत्सुकता आहे. विद्यमान सदस्य मंडळाचा कार्यकाल संपत आल्याने आणि निवडणूक कार्यक्रम येत्या 15 दिवसात केव्हाही जाहिर होण्याची शक्यता असल्याने छावणी मंडळ प्रशासनाने पुर्वतयारी करुन ठेवली आहे. मतदार याद्यांमधील मयत मतदारांची नावे वगळणे, दुबार मतदारांची नावे वगळणे, नवीन नावे समाविष्ट करणे अशाप्रकारे मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम पुर्ण झालेले आहे. निवडणूक विभागाकडून आदेश येताच प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार केल्या जाणार असल्याचे छावणी मंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

छावणी मंडळाची निवडणूक जाहिर झाल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऐन थंडीत भिंगारमधील राजकीय वातावरण तापणार आहे.