जैन ऋषी संप्रदायावरील अखिल भारतीय प्रश्नपत्र स्पर्धेत नगरच्या आशा भंडारी यांना प्रथम क्रमांक

अहमदनगर- जैन समाजातील ‘ऋषी संप्रदायका इतिहास’ या पुस्तकावर अखिल भारतीय स्तरावर झालेल्या प्रश्नपत्र स्पर्धेत नगरमधील आशा पोपटलाल भंडारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना 11 हजारांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे. युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज या पुस्तकाचे संयोजक असून पुस्तकाचे अतिशय आत्मियतेने वाचन करून भंडारी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. देशभरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी भंडारी यांनी केली आहे.

आशा भंडारी या आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांच्या मातोश्री आहेत. त्यांना लहान वयापासूनच वाचनाची प्रचंड आवड आहे. आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्यावर नितांत श्रध्दा असलेल्या भंडारी यांनी आचार्यश्रींच्या प्रेरणेतूनच धार्मिक पुस्तकांचेही सातत्याने वाचन केले. शालेय दशेपासून आई वडील आणि लग्नानंतर पती स्वर्गीय पोपटलाल भंडारी यांनी वाचनासाठी सदैव प्रोत्साहन दिल्याचे भंडारी यांनी सांगितले.

‘ऋषी संप्रदाय का इतिहास’ या पुस्तकात जैन धर्मातील ऋषी परंपरा, त्यांचे कार्य तसेच स्थानकांची निर्मिती, इतिहास अशा गोष्टींचा समावेश आहे. अतिशय सखोल व आत्मियतापूर्वक वाचनातून भंडारी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पुस्तकावरील बहुतांश प्रश्नांची त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे देवून देशात प्रथम क्रमांक मिळवण्याची मोठी कामगिरी केली आहे.

गृहकर्तव्ये पार पाडतानाही त्यांनी आपली वाचनाची आवड कायम ठेवली आहे. धार्मिक पुस्तके, ग्रंथांबरोबरच अन्य विषयांवरील वाचनही त्या आवर्जून करतात. याशिवाय विविध विषयांवरील खुल्या निबंध स्पर्धेतही त्या आवर्जून सहभाग घेवून आपले विचार अतिशय सुंदर, समर्पक शब्दात मांडत असतात. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.