भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा
अहमदनगर- प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री असतेच ती आई, बहीण, मुलगी, पत्नी अश्या रूपात असते. न थकता कुटुंबासाठी राबणारी महिला कधीही सुट्टी घेत नसते. 24 तास 365 दिवस परिवारातील सर्वांसाठी आनंदाने कार्य करीत असते. तिच्या सन्मानासाठी एक दिवस नाही तर 365 दिवस महिला दिन साजरा करावा. स्वातंत्र्य पूर्व काळापासून जिजाऊ माता, राणी लक्ष्मीबाई, रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अश्या अनेक कर्तृत्व सम्पन्न महिलांचे योगदान आहे. समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज, भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.पारस कोठारी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत हिंदसेवा मंडळाचे आजीव सभासद अॅड मंगला कोठारी, शांभवी जोशी, अलका कोठारी, सुलभा कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, विजया निसळ, कार्यक्रमाच्या समन्वयक अलका मुळे, अंजली वैद्य या होत्या. प्राचार्य सुनिल सुसरे आदी उपस्थित होते.
अॅड. मंगला कोठारी म्हणाल्या कि, स्त्री शिकली तर कुटुंब शिकते. 120 महीला येथे शिक्षण घेतात हि कौतुकास्पद बाब आहे. समाज सुसंकृत करण्याचे कार्य संस्था करीत आहे.
शांभवी जोशी म्हणाल्या कि, ज्या घरात स्त्री आनंदी समाधानी असते त्या घराची भरभराट होते. आई घरात नसली तर घर एकटे वाटते. आईला सन्मानाची अपेक्षा नसते. न कळत मिळणारी आदराची व प्रेमाची भावना, त्याग, ममत्व आपल्यातील स्त्री ओळखा व इतरांनाही सन्मान द्या.
सुलभा कुलकर्णी म्हणाल्या कि, रात्र प्रशालेत महिलांना शिक्षण देऊन पायावर उभे करण्याचे कार्य येथे घडत आहे. शिक्षण खण्डित झालेल्या महिलांना शिक्षणाची प्रेरणा देण्याचे कार्य चेअरमन डॉ.पारस कोठारी व प्राचार्य सुनील सुसरे तसेच शिक्षक वृंद करीत आहेत.
ज्योती कुलकर्णी म्हणाल्या कि, सर्वाना महिलादिनाच्या शुभेच्छा. प्राचीन काळापासून स्त्री हि पूजनीय आहे. ज्या घरात नारीचा आदर सन्मान होतो लक्ष्मी तेथे वास करते. अंजली वैद्य म्हणाल्या कि, स्त्री हि अबला नाही तर सबला आहे. जे अन्याय सहन करतात समाज त्यांच्यावरच अन्याय करतो. अन्याय सहन करू नका, प्रतिकार करायला शिका.
कार्यक्रमात महिलांचा गौरव तुळशी रोपे देऊन करण्यात आला. शाळेतील मुलींना शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. महीला शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
भाईसथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन माधुरी भोसले यांनी केले तर आभार वैशाली दुराफे यांनी मानले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते.