भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त 13 पासून आगडगावला सप्ताह

अहमदनगर- आगडगाव येथील काळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त 13 पासून सप्ताहास प्रारंभ होत आहे. त्याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. जन्मसोहळ्याचा मुख्य कार्यक्रम 19 रोजी रात्री 12 वाजता होणार आहे.

या सप्ताहानिमित्त 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान रोज सकाळी 8 ते 12 या वेळेत काशीखंड पारायण, दुपारी 1 ते 4 महिला भजनीमंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन होणार आहेत. ता. 13 पासून अनुक्रमे उद्धव मंडलीक, श्रीनिवास घुगे, ज्ञानेश्वर पठाडे, ताजोद्दीन शेख, गजानन कळमुनीकर, ज्ञानेश्वर कदम, पारस मुथा आदी महाराजांची कीर्तन होतील.

जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम मंगळवार 19 रोजी होईल. त्या दिवशी डॉ. ज्ञानेशानंद महाराज व ज्ञानेश्वर तांबे महाराजांचे कीर्तन होईल. रात्री दहा वाजता बद्रिनाथ तनपुरे महाराजांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होईल. रात्री 12 वाजता जन्मोत्सव होईल. या दरम्यान रोज भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानच्या दोन बसची व्यवस्था असून, एसटी महामंडळाच्या बसेस रोज उपलब्ध आहेत.