भुसार व्यापारी व हमाल पंचायतीचा शनिवारी बंद

बाजार समिती कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला व्यापारी असोसिएशनचा पाठिंबा : राजेंद्र चोपडा

अहमदनगर – कृषी उत्पन्न बाजार समिती उत्कृष्टरित्या चालण्यात बाजार समिती कर्मचार्‍यांचा मोठा वाटा आहे. बाजार समिती कर्मचारी, हमाल मापाडी असे सर्वच घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच बाजार समिती कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला व्यापारी वर्गाचाही पाठिंबा आहे. यासाठी 10 ऑगस्ट रोजी भुसार व्यापारी एक दिवसाचा बंद ठेवून बाजार समिती कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणार आहेत, अशी घोषणा दि. अहमदनगर आडते बाजार मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी केली.

बाजार समिती कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत समावून घेण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष व नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक नज्जू पहिलवान, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष शांतीलाल गांधी, राजेंद्र बोथरा, मानद सचिव संतोष बोरा, रवींद्र गुजराथी, गोपाल मनियार, सदस्य शैलेश गांधी, कांतीलाल गुगळे, सुशिल भळगट, विश्वनाथ कासट, किशोर श्रीश्रीमाळ, राजेंद्र डागा, संजय लोढा, रितेश कोठारी, अजित गुगळे उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक घुले व नज्जू पहिलवान यांचा व्यापारी असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक घुले म्हणाले की, आडते बाजार मर्चंटस् असोसिएशनने बाजार समिती कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या बंदमध्ये हमाल पंचायतही सहभागी होवून 10 ऑगस्टला आंदोलनात उतरणार आहे. हमाल पंचायतीच्या माध्यमातून माझा व्यापार्‍यांशी संबंध कायम येत असतो. आडते बाजार, दाळमंडई हा व्यापारी परिसर माझ्याच प्रभागात येतो. त्यामुळे या परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील.

नगरसेवक नज्जू पहिलवान म्हणाले की, नगरच्या विकासात व्यापारी, व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. आडतेबाजार, दाळमंडई आदी परिसरातील व्यापार्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या भागातील रस्ते, पाणी, पथदिवे असे मूलभूत प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहिल. व्यापार्‍यांसमवेत नियमित चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा