देवीच्या नावावरुनच गावाची ओळख असणारे जेऊर बायजाबाईचे

नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता एक जागृत देवस्थान आहे. या देवीच्या नावावरुनच या गावाचे नाव जेऊर बायजाबाई असे पडलेले आहे. जेऊर या नावाबाबत एक आख्यायिकाही सांगितली जाते. एका जेवणाच्या डब्यात इंग्रजांच्या लष्कराला जेवन देऊन सुध्दा देवी बायजामातेकडे अन्न शिल्लक राहिले होते. जेवण करुनही ऊरलेले अन्न पाहून इंग्रज अधिकारीही अवाक् झाले होते. यावरुनच गावाला जेऊर असे नाव पडल्याचे सांगण्यात येते.

एकदा पतीला जेवनाचा डबा द्यायला उशिर झाल्याने पती रागावतील या भितीने बायजामाता डोंगरावर अदृश्य झाली. पुढे पाटलाच्या स्वप्नात जाऊन हकिकत सांगितल्यावर देवीची विधिवत पूजाअर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आल्याची आख्यायिका आहे. बायजामातेचे माहेर पारनेर तालुक्यातील जामगाव तर काहिंच्या मते पाथर्डी तालुक्यातील मिरी असल्याचे सांगण्यात येते. याबाबत इतिहास संशोधक अभ्यास करत आहेत. देवीचा साक्षात्कार झाल्याचे अनेक भक्त सांगतात, देवी बायजामाता एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. बायजामाता म्हस्के कुटुंबात सुन म्हणून आली होती. देवीचे भगत म्हणून म्हस्के कुटुंबियांना मान आहे. तर पालखी मिरवणूक आजही परंपरेने पवार पाटलांच्या वाड्यातूनच निघते.

राज्यात प्रसिद्ध असलेला देवी बायजामातेचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे वैशाख पोर्णिमेच्या (बुद्ध पौर्णिमा) दिवशी असतो. यात्रोत्सवात सकाळी देवीला गंगेच्या पाण्याचा जलाभिषेक, कावडी मिरवणूक व संध्याकाळी पालखी (छबीना) मिरवणूक, शोभेची दारु, मनोरंजनाचे कार्यक्रम, दुसर्‍या दिवशी सकाळी कलावंताच्या हजेर्‍यांचा कार्यक्रम, दुपारी वांगे भाकरीचा महाप्रसाद, कुस्त्यांचा जंगी हंगामा व नंतर करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच तिसर्‍या दिवशी पुन्हा वांगे भाकरीचा महाप्रसाद व कुस्त्यांचा हंगामा होत असतो. यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

दोन दिवस कुस्त्यांचा हगामा व वांगे भाकरीचा महाप्रसाद हे यात्रेचे वैशिष्ट्य आहे. यात्रोत्सव काळात संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने भक्त भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. बायजामाता मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु आहे. नगर औरंगाबाद महामार्गावर पवित्र सीना नदीच्या तीरी असलेल्या उंच टेकडीवर भव्य असे हेमाडपंथी देवीचे मंदिर उभारले आहे. यात्रोत्सव काळात मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. यात्रोत्सवादरम्यान येणार्‍या भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशिल असतात.

मंदिर जीर्णोध्दारासाठी सहकार्य करा

जेऊर गावचे आराध्य, ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम अंतिम टप्प्यात असून, गाभार्‍याचे काम बाकी आहे. मंदिराचा जीर्णोध्दार लोकवर्गणी तसेच लोकसहभागातुन सुरु आहे. यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन समिती व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यभरात एकमेव दोन दिवसांचा हंगामा

राज्यभरात अनेक देवी देवतांचा यात्रा भरतात. तसेच यात्रोत्सवादरम्यान जंगी हंगामे भरवले जातात. मात्र ते केवळ एकच दिवस भरवले जातात. सलग दोन दिवस हंगामा भरवणारे राज्यातील जेऊर गाव प्रसिध्द आहे. तसेच यादरम्यान येणार्‍या पाहुणे व खेळणी वाल्यांसाठी गावच्या वेशीमध्ये दोन दिवस वांगे भाकरीचा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हे या यात्रेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य व परंपरा आहे.

पालखीला पवार पाटलांचा मान

देवी बायजामाता यात्रोत्सवाची पालखी मिरवणूक ही परंपरेने पवार पाटील यांच्या वाड्यातूनच निघते. कै. दिगंबर पाटील नंतर कै.आण्णा पाटील यांच्यानंतर अमृतराव पाटील व त्यांचे बंधु देवीच्या मुखवट्याची नियमीत पूजा करत आहेत. वर्षभर देवीचा मुखवटा वाड्यातच ठेवण्यात येतो. यात्रोत्सवाच्या दिवशी ही पालखी मिरवणुकीला पाटलाच्या वाड्यातून सुरुवात होते. ही परंपरा आजही सुरू आहे.

नवरात्रोत्सवात केले जाते अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बायजामाता मंदिर येथे नवरात्रोत्सवात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही घटस्थापनेच्या दिवसापासून अखंड हरीनाम सप्ताह सुरु झालेला आहे. यात रविवार दि. 29 रोजी ह.भ.प. आसाराम महाराज पालवे, सोमवार दि. 30 ह. भ. प. रघुनाथ महाराज तोडमल, मंगळवार दि.1 ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज काळे, बुधवार दि.2 ह.भ.प मनोज महाराज सिनारे, गुरुवार दि.3 ह.भ.प. महादेव महाराज कौर, यांची कीर्तने झाली तर शुक्रवारी दि.4 ह.भ.प. डॉ. वेणुनाथ महाराज वेताळ, शनिवारी दि.5 ह.भ.प. अमोल महाराज सातपुते, रविवारी दि.6 ह.भ.प. ससे महाराज, सोमवारी दि.7 ह.भ.प. कदम महाराज यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी दि.8 दिंडी प्रदक्षिणा तसेच ह.भ.प.मच्छिंद्र महाराज तवले यांचे काल्याचे कीर्तन त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. नवरात्रोत्सव काळात काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, नामजप, हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. नवरात्रोत्सव काळात येथे राज्यातून मोठ्या संख्येने भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात.

शब्दांकन – सुनिल हारदे मो. 8446447744