बॅलेट पेपरवर मतदानाच्या मागणीसाठी नगरमध्ये धोकादर्शक घंटानाद आंदोलन

अहमदनगर- विधानसभेचे मतदान बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात गुरुवारी (दि. 19) येथील हुतात्मा स्मारकात दिवसभर धोकादर्शक घंटानाद आंदोलन करण्यात आले. मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाचे जालिंदर चोभे मास्तर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद करण्यात आला. निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या सहाय्याने मतप्रक्रिया राबवून लोकशाहीला सुरुंग लावला आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ मुखवटा असून सर्व कारभार संघाचे कार्यकर्ते पाहत आहेत. ईव्हीएमवर मतदान झाले तर देशात हुकूमशाही येईल. त्यामुळे आयोगाच्या विरोधात जनतेच्या न्यायालयात जाणे गरजेचे झाले असे स्पष्ट करत हॉंगकॉंगच्या नागरिकांप्रमाणे लोकतंत्रासाठी आता सर्वांनाच लढावे लागेल. त्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन चोभे मास्तर यांनी केले आहे.