व्यापार्‍यांना फसविणार्‍या टोळीचा पर्दाफाश; दोघे अटकेत

नगर – शहरातील भुसार मालाच्या व्यापार्‍यास 9 लाख 51 हजार रूपयांचा गंडा घालणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.3) करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, भगवानदास मुळचंद गांधी (वय 72, रा. सारसनगर, कानडे मळा, सार्थक हॉस्पिटल शेजारी, नगर) यांच्या आडत दुकानातुन ट्रक चालक मुकेश कुमार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) याने धुळे येथील महाराष्ट्र ऑईल ऍक्ट्रक्शन प्रा. लि. येथे पोहोचविण्याकरीता 230 क्विंटल सोयाबीन (किंमत 9 लाख 51 हजार 717 रूपये) भरून नेले. परंतु मालट्रक (क्र. एन पी 09 एच एच 9919) नियोजित स्थळी न नेता स्वत:च्या घरी उतरवून गांधी व कंपनीची फसवणुक केली.

या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गांधी यांच्या फिर्यादीवरून 406 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. कोतवाली पोलिसांनी ताबडतोब तपासाची सुत्रे हलविल्याने चालक महेंद्रकुमार याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. मात्र ट्रक मालक बबलु उर्फ काशिद रशिद शेख (रा. सैंधवा, बडवानी, मध्यप्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोयाबीनचा ट्रकचा अपहार केल्याची कबुली केली व चालक मनोज कुमार उर्फ संतोष कुमावत (रा. ठिकरी, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदर ट्रकबाबत चौकशी केली असता सदर मालट्रकची बॉडी बदलण्याकरीता गाडी गॅरेजमध्ये लावली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हा ट्रक राज ट्रक बॉडी बिल्डर (मॅकेनिकल नगर, सैधवा) येथुन ताब्यात घेतला व काशिद रशिद शेख व रियाज रज्जाक शेख यांना अटक केली. चोरीचा माल हा मनोज रमेशचंद्र वाणी यांच्या गोडाऊनमध्ये ठेवल्याने पोलिसांनी सोयाबीनसह मालट्रक जप्त केला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ, पोलिस नाईक अण्णा बर्डे, पो. कॉ. राहुल शेळके, पो.कॉ. राजु शेख यांनी केली.