गावठी पिस्तुलासह दोघे अटकेत

अहमदनगर- विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना शिर्डी पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.10) सकाळी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये याकरिता शिर्डी पोलिस शहरात गस्त घालून शोधमोहिम घेत असताना अक्षय सुधाकर थोरात (वय 22, रा.जवळके, ता.कोपरगाव, हल्ली रा.वाघ वस्ती रोड, शिर्डी, ता.राहाता) याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी शिर्डी परिसरात थोरात याच्या राहत्या घराजवळ सापळा रचुन अक्षय थोरात व पवन भोत यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला. थोरातकडे कसुन चौकशी केली असता हे गावठी पिस्तुल शिरापूर (जि.धुळे) येथून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी राहाता पोलिसांनी दोघाविरुद्ध भारतीय हत्त्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.