केंद्रशासनाच्या अमृत योजनेची ‘फेज – 2’ सारखी वाट लागण्याची भीती

मे.शोनन इंजिनिअरींग यांचे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी : उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांची आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर – केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत कामासाठी नेमलेल्या मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि.,पुणे या संस्थेकडून या कामाच्या मुदतीत ते पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या संस्थेला कामासाठी मुदतवाढ देवू नये अन्यथा अमृत योजनेची ’फेज – 2’ सारखी वाट लागण्याची भीती आहे. त्यामुळे या संस्थेचे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या कामासाठी मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि., पुणे या कंपनीची निविदा मंजुर होउन त्यांना दि.1 नोव्हेंबर 2017 मध्ये महानगरपालिकेने कामाचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे. सदरील काम दोन वर्षात पुर्ण करण्याची अट असतांनाही हे काम आज अखेर पुर्ण केलेले नाही. या कामाची एकुण आर्थिक प्रगती -36 टक्के व एकुण भौतिक प्रगती -42 टक्के इतकी असल्याचे निदर्शनास येते. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांचे सुचनेनुसार दि.31 ऑक्टोबर 2019 पर्यंत काम पुर्ण करणे आवश्यक होते. सदरील संस्थेच्या सद्यस्थितीच्या कामाची परिस्थिती पहाता हे काम पुढील तीन ते चार वर्ष पुर्ण होणार नाही. ही संस्था अकार्यक्षम असुन काम करण्यास सक्षम नाही. निविदा अटी व शर्तीचे भंग करणारे काम त्यांच्याकडुन होत आहे. शहर पाणीपुरवठा योजना फेज-2 चे व अमृत योजनेचे काम मार्गी लागत नसल्याने जनतेस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही व नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अमृत योजनेचे काम रदद न केल्यास शहर पाणीपुरवठा योजना फेज-2 सारखेच हे काम रखडले जाईल व शासनाकडुन येणार्‍या अनुदानाचा गैरवापर होऊन या कामाचीही विल्हेवाट लागणार आहे. या संस्थेला मुदतवाढ देणे महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. यामुळे महापालिकेने अमृत योजनेचे काम रद्द करुन त्यांना काळया यादीत टाकणे तसेच नव्याने प्रसिध्द केलेल्या कामास अतिरिक्त खर्च आल्यास सदरचा खर्च मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि.पुणे यांच्याकडील सुरक्षा रक्कम, जंगम मालमत्ता, बँकखाते इ.स्त्रोतांमधुन वसुल करण्यात यावेत.

तरी केंद्रशासनाच्या अमृत योजनेचे काम मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि. पुणे या संस्थेला मुदतवाढ देणे महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य होणार नसल्यामुळे व नगरवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची व जिव्हाळयाची ही योजना रखडली जाऊ नये व या योजनेची फेज-2 प्रमाणे स्थिती होऊ नये याकरीता महापालिकेच्या अमृत योजनेचा कार्यारंभ आदेश रद्द करण्यात येउन फेरनिविदा मागविणेबाबत आदेश द्यावेत. तसेच याकामाकरिता नेमण्यात आलेली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही कामाची पाहणी व बारचार्ट प्रमाणे काम देउन ते करून घेत नाही. या कामावर पी.एम.सी.चे नियंत्रण नाही. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पुर्ण होऊ शकत नाही. याकरीता शासनाकडे पी.एम. सी.चा (PMC) अहवाल सादर करावा. अशी मागणी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांनी आयुक्तांकडे केली आहे.