सर्जेपुरात दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान

अहमदनगर – शहरातील सर्जेपुरा परिसरातील रंगभवन जवळील अँटोमोबाईल्सच्या दुकानाला आग लागली. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले. हि घटना सोमवारी (दि.28) रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास घडली.

सर्जेपुरा येथील रंगभवन जवळ बाळासाहेब खंडेलवाल यांचे अँटोमोबाईलचे दुकान आहे. सोमवारी रात्री दुकानाजवळ काही लहान मुले खेळत असता त्यांना शॉटसर्किट झाल्याचा मोठा आवाज आला. त्याचबरोबर दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे दिसताच जवळच राहणारे खंडेलवाल हे घाईघाईने दुकानाकडे आले. त्यांनी दुकान उघडून पाहताच आतून आगीचा भडका बाहेर आला. आग लागल्याचे निदर्शनास येताच आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

येथील माजी नगरसेवक आरिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनवणे, योगेश सोनवणे, निलेश खंडेलवाल यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने या घटनेची माहिती अग्निशमन पथकाला देण्यात आली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने आग विझाविण्याचा प्रयत्न केला. ही आग सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. नागरिकांची व अग्निशमन दलाची वेळेतच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळाला. दुकानातील बराचसा भाग लाकडाचा असल्याने आतील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले.

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्याप स्पष्टपणे समजू शकले नाही. मात्र हि आग शॉटसर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीच्या चर्चेतून मिळाली. याबाबत तोफखाना पोलिसांनी जळीताची नोंद केली आहे.