जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई; साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त; 27 जण ताब्यात

अहमदनगर- जिल्हा पोलिसांनी शहरासह उपनगर व तालुक्यातील अवैध धंद्यावर छापा सत्र सुरू केले असून या कारवाईत पोलिसांनी 23 विविध ठिकाणच्या अवैध धंद्यावर छापा टाकून रोख रक्कम, जुगाराचे साधन, देशी-विदेशी दारू, वाहने व वाळू असा 8 लाख 32 हजार 975 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी दि.11 ते मंगळवार, दि.14 दरम्यान तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, राहुरी, जामखेड, शेवगाव, अकोले, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कालावधी दरम्यान अवैध धंद्याविरुद्ध कारवाई मंदावली होती. परंतु लोकसभेची आचारसंहिता उठल्यानंतर पोलीस अधीक्षक ईशु सिंधु यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत विशेष करुन अवैध दारू विक्री, मटका जुगार व्यवसाय, अवैध वाळू चोरी व वाहतूक करणार्‍या व्यक्तींविरुद्ध कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार विविध पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता महाराष्ट्र दारुबंदी कायदा व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक ईशु सिंधु, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने केली आहे.