अहमदनगर- नगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार असलेला बिरजा राजू जाधव (वय 22, रा.मकासरे चाळ, कोठी, नगर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोठी-मार्केटयार्ड जाणार्या रोडवर वावरताना शिताफीने पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) केली.
नगर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार केलेला बिरजा जाधव हा हद्दपार आदेशाचा भंग करुन कोठी परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यास कोठी चौक ते मार्केटयार्ड रोडवर शिताफीने अटक केली. बिरजा जाधव यास 27 एप्रिल 2019 रोजी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 151 चे कलम 55 नुसार अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपार केलेले होते. असे असताना तो कोणतीही परवानगी न घेता हद्दपार आदेशाचा भंग करुन शहरात प्रवेश करुन फिरताना पोलिसांना आढळून आला.
यावरुन पोलिस नाईक संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई कोतवाली पोलिस करीत आहेत.