आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

लवंग

फार प्राचीन काळापासून आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदशास्त्रात देखील लंवगांचा वापर केला जातो. अनेकजण घरगुती औषध म्हणूनही तिचा वापर करतात. मसाल्यामध्ये सुगंध आणण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो. मराठीमध्ये ’लवंग’, हिंदीमध्ये ’लौंग’, इंग्रजीत ’क्लोव्ह’, संस्कृतमध्ये ’देवकुसूम’, तर शास्त्रीय भाषेत ’युजेनिआ कॅरिओफिलाटा’ (Eugenia Caryophylata) या नावाने ओळखली जाणारी लवंग ‘मिर्टेसी’ या कुळातील आहे.

लवंगेचे झाड पंचवीस ते चाळीस फूट उंच व वर्षभर हिरवेगार असते. या झाडावर तीन-तीन गुच्छांचा समूह तयार होतो. या गुच्छांना कळ्या लागतात. या कळ्या फुलून लहान फुले होतात. या फुलांनाच आपण ’लवंग’ असे म्हणतो. जेथे पाऊस खूप पडतो, तेथे लवंगेचे झाड दिसून येते. जगामध्ये सिंगापूर व पूर्व आफ्रिकेत ही झाडे भरपूर प्रमाणात आहेत. मल्लाक्का, जंगबार व त्याच्याजवळ असणार्‍या फेम्बा टापूमध्ये लवंगेची झाडे अधिक प्रमाणात आहेत. भारतामध्येही लवंगेची झाडे आढळतात. परंतु त्याचे प्रमाण खूप कमी आहे. लवंगेचे दोन प्रकार आहेत. एक तीव्र सुगंधाची काळी लवंग व दुसरी धुरकट रंगाची लवंग होय. जी लवंग उग्र वासाची, तिखट आणि दाबल्यानंतर तिच्यामध्ये तेलाचा अंश असल्याचे जाणवते. ती उत्तम प्रतीची असते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : लवंग सुगंधी, उत्तेजक, रक्तविकारनाशक, कफघ्न, अग्निदीपक, पाचक, दुर्गंधीहारक, रुची उत्पन्न करणारी, डोळ्यांना हितकारक आहे. तिच्या या गुणधर्मामुळे मळमळणे, उलटी होणे, पोटात कळ येणे, तीव्र दातदुखी, डोळे दुखणे, पोट फुगणे, अति तहान लागणे, खोकला, श्वास अशा अनेक विकारांवर तिचा उपयोग होतो.

आधुनिक शास्त्रानुसार : लवंगेमध्ये ऊर्जा, कार्बोहाड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्व ’अ’, ’क’ व ’ई’, कॅल्शिअम, लोह, कॉपर, मॅग्नेशिअम, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, सोडिअम, पोटॅशिअम ही घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

1) खोकला येत असेल. तर लवंग तोंडात चघळल्याने खोकल्याची ढास कमी होते. तसेच घशातील खवखव कमी होऊन खोकला दूर होण्यास मदत होते.

2) सर्दी-खोकला, घसा धरणे, आवाज बसणे अशा विकारांवर भाजलेली लवंग तोंडात ठेवून चघळल्यास घशाची सूज कमी होऊन आवाज मोकळा होतो.

3) वारंवार सर्दी होऊन नाकातून पाणी गळत असेल, तर अशा वेळी हातरुमालावर लवंगांचे तेल टाकून तो हुंगावा.

4) बारीक केलेल्या लवंगांचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी त्वरित थांबते.

5) लवंगांचे तेल कपाळावर चोळल्याने सुद्धा डोकेदुखी थांबते.

6) अपचन, गॅस यांमुळे होणारी पोटदुखी थांबविण्यासाठी पाव चमचा लवंगपूड आणि एक चमचा खडीसाखर एकत्रित करून दिवसातून दोन वेळा खावी.

7) तीव्र स्वरूपात दातदुखी जाणवत असेल, तर तत्काळ वेदना कमी करण्यासाठी लवंगांच्या तेलात भिजविलेला कापसाचा बोळा ठणकत असलेल्या दातावर घट्ट दाबून ठेवावा. याने दातदुखी त्वरित थांबते.

8) लवंग पाण्यात उकळून ते पाणी दिवसभर प्यायल्याने सर्दी-खोकला, अपचन, तोंडास दुर्गंधी येणे, भूक न लागणे हे विकार कमी होतात.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा