आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

आयुर्वेदिक उपचार : शरद ऋतूमध्ये आहार-विहाराची काळजी घेतली गेली नाही, तर अनेक प्रकारचे पित्तप्रकोप व आजार उद्भवतात. उष्णतेचे विकार, त्वचाविकार या काळात जास्त दिसून येतात. आम्लपित्त, अपचन, त्वचेचे विकार व शरीरदाह कमी करण्यासाठी प्रवाळ-पंचामृत, सुतशेखर, कामदुधावटी, गुलकंद, अविपत्तीकर चूर्ण, दाडीमावलेह ही औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावीत. तसेच पंचकर्म उपचारांमध्ये पित्तप्रकोप कमी करण्यासाठी विरेचन कर्म करून घ्यावे. पित्त रक्ताच्या आश्रयाद्वारे राहत असल्याने रक्तमोक्षण कर्म उपयोगी ठरते. निरोगी व्यक्तीने देखील पित्ताचे, उष्णतेचे व रक्ताचे विकार होऊ नये म्हणून विरेचन कर्म करून घ्यावे.

हेमंत ऋतुचर्या :

हेमंत आला तशी थंडी आली ।

घेऊनी उणासि निवारयेली ॥

शेकावया शेगडि पेटवीली ।

बाला सुखावे बहु शोभवीली ।

हेमंत ऋतू हिवाळ्यामध्ये येतो. या काळामध्ये खूप थंडी पडलेली असते. थंडीचा आरोग्यावर परिणाम होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाने लोकरीचे वेगवेगळे उबदार कपडे परिधान करावेत. तसेच शेगडी पेटवून शेकोटी करावी. बाह्य वातावरण उबदार ठेवून थंडीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे काव्यपंक्तीत सांगितले आहे.

शरीरदोष अवस्था : हेमंत ऋतूत भरपूर थंडी असते. त्यापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी त्वचा संकुचित होते. त्यामुळे घाम येत नाही. त्वचा संकुचित झाल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. पर्यायाने शरीरातील अग्निशक्ती (जाठराग्नी) प्रदीप्त होते. त्यामुळे उत्कृष्ट शारीरिक बलस्थिती व शरीरातील त्रिदोषांची साम्यावस्था यामुळे कोणताही आजार उद्भवत नाही. चांगले आरोग्य मिळविण्याच्या दृष्टिकोनातून हेमंत व शिशिर हे दोन्ही ऋतू खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून या ऋतूत प्रकृतीला योग्य व्यायाम व पौष्टिक सकस आहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

आहार : शरीरातील जाठराग्नी वाढलेला असतो, त्यामुळे या ऋतूमध्ये खूप भूक लागते. वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. सकाळी सकस, पौष्टिक, परिपूर्ण न्याहारी करावी. तसेच दुपारचे व रात्रीचे जेवण देखील पोटभर करावे. कारण व्यवस्थित आहार घेतला गेला नाही, तर जाठराग्नी शरीर धातूंचेच पाचन करण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची झीज होऊन दुर्बलता व अशक्तपणा वाढतो. त्रिदोष साम्यावस्थेत असल्यामुळे सहसा कोणताही आजार उद्भवत नाही. स्वच्छ आकाश, थंड वातावरण यामुळे मन प्रसन्न असते. जो काही आहार घेतला जातो तो शरीराला पोषक ठरतो.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12