आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

शरीरदोष अवस्था : पिंडी ते ब्रह्मांडी ही उक्ती आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. निसर्गाचे चक्र ज्याप्रमाणे सुरू असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे देखील सुरू असते. ग्रीष्म ऋतूत रखरखीत, प्रखर उन्हामुळे पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण कमी होऊन सर्व ठिकाणी रूक्षता निर्माण होते. याच पद्धतीने शरीरामध्ये सर्व अवयवांत रूक्षता निर्माण होते. या रूक्षतेमुळेच शरीरामध्ये वातदोषाचे अधिक्य निर्माण होते. बाह्य वातावरणाचा परिणाम शरीरावर लगेचच होतो. कडक उन्हामुळे शरीराला घाम फार येतो. घामावाटे शरीरातील उष्मा बाहेर पडतो. त्यामुळे शरीरातील अग्निशक्ती खर्ची पडते आणि शरीरात अग्निमांद्य निर्माण होते. म्हणजेच पचनशक्ती कमी होते.

आहार : या ग्रीष्म ऋतूत मधुर (गोड), आम्ल (आंबट), लवण (खारट) या रसांचे पदार्थ जास्त प्रमाणात आहारामध्ये घ्यावेत. याउलट तिक्त (कडू), कटु (तिखट), कषाय (तुरट) या रसाचे पदार्थ अगदी कमी प्रमाणात घ्यावेत. कारण या रसांमुळे वातदोषाचे अधिक्य वाढते. म्हणून हरभरा, तूर, मटकी, कुळीथ अशाप्रकारची कडधान्ये व त्यापासून बनविलेल्या डाळी आहारात घेऊ नयेत. मुगाचा वापर थोड्याफार प्रमाणात करू शकतो. आहारामध्ये पोळी, भाकरी, भात, तसेच पालेभाज्यांचे प्रमाण भरपूर असावे. भोपळा, दोडका, घोसाळे, भेंडी, लाल भोपळा यांसारख्या फळभाज्या, तसेच पालक, राजगीरा, तांदुळजा, चुका, माठ यांसारख्या पालेभाज्या आहारामध्ये घ्याव्यात.

गाजर, काकडी, टोमॅटो, बीट, कांदा यांचे सॅलड जेवणामध्ये आवर्जून घ्यावे. उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून या ऋतूमध्ये कच्चा कांदा खाणे जास्त हितकारक आहे. कारण कांदा उष्णतेपासून होणार्‍या सर्व विकारांपासून शरीराचा बचाव करतो. बाजरीची भाकरी अजिबात खाऊ नये, कारण ती उष्ण व रूक्ष गुणाची असते. त्यामुळे शरीरात वातसंचय होऊन वातप्रकोप होऊ शकतो. बटाटा, रताळी, सुरण ही कंदमुळे मधुर रसाची असल्याने आहारामध्ये भरपूर खावीत. या ऋतूमधील सर्व फळे खावीत. कलिंगड, खरबूज, कैरी, करवंदे, जांभूळ, द्राक्षे, केळी, डाळिंब, अंजीर, पेरू, आंबा अशी सर्व मधुर व आंबट रसाची फळे खावीत. या ऋतूमध्ये फळे उपलब्ध असणे हे निसर्गाने सर्वांसाठी दिलेले वरदानच आहे. त्यांचा आरोग्य राखण्यासाठी आहारामध्ये भरपूर वापर करावा. या फळांमुळे अशक्तपणा, थकवा व उष्णतेचे विकार कमी होतात.

ग्रीष्म ऋतूत उष्णतेमुळे शरीरातील स्निग्धता कमी होते. म्हणून या ऋतूत भरपूर द्रवपदार्थ पिणे गरजेचे आहे. लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, फळांचा रस, नारळाचे पाणी पिणे या ऋतूत लाभदायक ठरते. फक्त सरबत करताना साखरेऐवजी नैसर्गिक गुळाचा वापर करावा. तसेच नाचणीची खीर, तांदळाची खीर, शेवयाची खीर, रव्याची खीर अशा विविध खिरी ड्रायफुट्स टाकून खाव्यात. फक्त आहार घेताना तो भरपेट न घेता कमी प्रमाणात व हलका घ्यावा. कारण या ऋतूमध्ये पचनशक्ती कमी झालेली असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा