आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

कटू (तिखट), तिक्त (कडू) व कषाय (तुरट) या रसांनी युक्त पदार्थ आहारामध्ये जास्त प्रमाणात वापरावेत. तिखट, कडू व तुरट रस कफ कमी करणारे असल्याने या रसांचे पदार्थ आहारात वापरणे आरोग्यासाठी हितकारक आहे. यासाठी आहारामध्ये तूर, मूग, मसूर, हरभरा या डाळींचा व कडधान्यांचा वापर करावा. मुगाचे कढण, मसुराची आमटी, कुळथाची, मटकीची उसळ, कुळथाचे शेंगुळे, सूप अशाप्रकारे विविध आहारीय पदार्थ बनवावेत. तसेच या ऋतूमधली सर्व फळे खावीत.

उदाहरणार्थ : आवळा, कवठ अशी तुरट रसांची फळे या ऋतूत खावीत. या फळांमुळे कफाचे प्रमाण कमी होते. तसेच पालेभाज्यांमध्ये मेथी, तांदुळजा, शेपू, राजगीरा, माठ, चाकवत या भाज्या खाव्यात. तसेच दुधी भोपळा, दोडके, घोसाळे, वांगी, मुळा, वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, कारले, गवार अशा भाज्या या ऋतूत आवर्जून खाव्यात. भाज्यांना फोडणी देण्यासाठी जिरे, मोहरी, लसूण, मिरची, लवंग, दालचिनी यांसारख्या तिखट, अग्नी प्रदीप्त करून आहार पचविणार्‍या पदार्थांचा वापर अवश्य करावा. वरणाला फोडणी देऊन त्यामध्ये आमसूल (कोकम) जरूर टाकावे. यामुळे पचन चांगले होते.

आहारात दह्याऐवजी ताकाचा वापर करावा. कारण दही हे स्रोतोरोध करून शरीराची सूज वाढविते, तर ताक हे अग्नी प्रदीप्त करून आहाराचे पचन करते. साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. कारण गूळ चवीने गोड असला, तरी तो उष्ण गुणाचा असल्याने कफनाशक आहे. अशाच पद्धतीने मधदेखील गोड असून, उष्ण गुणात्मक व कफनाशक आहे. म्हणून आहारामध्ये गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा व मधाचा वापर जास्तीत जास्त करावा.

आहाराचे प्रमाण कमी ठेवावे. एकाचवेळी भरपेट जेवू नये. त्याऐवजी थोड्या अंतराने हलके पदार्थ खावेत. मांसाहार करावयाचा असेल तर मासे, खेकडे अशा जलचर प्राण्यांचे मांस खाऊ नये. कारण जलचर प्राण्यांमुळे कफप्रकोप होतो. त्याऐवजी चिकन, मटण असा मांसाहार घ्यावा, परंतु याचे प्रमाण कमी असावे.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा