आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

तांदूळ

उपयोग :

1) तांदूळ पूर्ण अन्न असल्याने आहारामध्ये भात खाणे उत्कृष्ट असते. पण त्यामध्ये सुद्धा दही-भात, दूध-भात व ताक-भात खाणे आरोग्यास हितकारक असते. फक्त दूध-भात खायचा असेल तर भात शिजविताना मीठ घालू नये.

2) शेतामध्ये नवीनच निर्माण झालेला तांदूळ वापरावयाचा असेल, तर तो थोडासा भाजून त्याचा भात करावा किंवा आहारामध्ये कमीत कमी सहा महिने जुना तांदूळ वापरावा. कारण नवीन तांदळामुळे शरीरामध्ये आमनिर्मिती होऊ शकते.

3) वरण-भात बनविताना शक्यतो तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरावी. मुगाची डाळ ही पचनास हलकी व पित्तशामक असते.

4) लहान मुले व रुग्णांसाठी तांदळाच्या कण्या व मूगडाळीची भरड एकत्र पातळ शिजवून त्याला जिरे, गायीचे तूप व कोथिंबीर यांची फोडणी देऊन प्यायला दिल्यास थकवा जाऊन उत्साह निर्माण होतो.

5) तांदळाच्या पेजेमध्ये मध घालून दिल्यास जास्त प्रमाणात लागणारी तहान कमी होते.

6) उष्णतेचा त्रास जाणवून शरीराचा दाह होत असेल, तर अशा वेळी तांदळाच्या लाह्या बारीक करून त्याचा काढा बनवावा व त्यामध्ये एक चमचा बारीक केलेली खडीसाखर मिसळून वारंवार प्यायला दिल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.

7) भूक न लागणे, अपचन, आम्लपित्त, जुलाब, उलट्या, वारंवार तहान लागणे या विकारांवर तांदळाच्या लाह्या चघळाव्यात. या लाह्या शीत, लघु, पचण्यास हलक्या, अग्निप्रदीप्त करणार्‍या व उत्साहवर्धक असल्यामुळे वरील विकार दूर होतात.

8) तांदळामुळे धातूंचे पोषण उत्तम रीतीने होत असल्यामुळे लहान बालके, गर्भवती स्त्रिया व बाळंतिणीच्या आहारामध्ये यापासून कल्पकतेने बनविलेल्या विविध पदार्थांचा वापर करावा.

9) तांदळापासून खिचडीभात, मसालेभात, डाळभात, केसरी भात, नारळी भात, पुलाव, बिर्याणी असे विविध प्रकार बनविता येतात.

10) तांदळाच्या पिठापासून दशमी, भाकरी, पुरी, पराठे, धिरडे, खीर, इडली, डोसा, अंबोळ्या असेही पदार्थ बनविता येतात. हे सर्व पदार्थ आरोग्यास सकस व पौष्टिक असतात.

सावधानता : आधुनिक काळात हातसडीच्या तांदळावरील कोंडा, साल, सत्त्व, काढून पॉलिश केलेला पांढरा तांदूळ बनविला जातो. हा तांदूळ दिसायला चमकदार व आकर्षक असतो. व्यापारी लोक हा तांदूळ चमकदार दिसण्यासाठी यावर ग्लुकोज/टाल्कम पावडरचे पातळ आवरण चढवतात. परंतु ते हानिकारक असते. या सर्व प्रक्रियांमुळे यामधील ‘बी’ जीवनसत्त्व व बरीचशी खनिजे नाश पावतात. म्हणून सहसा हातसडीचा तांदूळ खावा. तांदळाला कीड लागू नये व तो जास्त दिवस टिकून राहावा याकरिता त्यामध्ये खडेमीठ टाकून डब्यात भरून ठेवावे.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा