आगामी महापौरपदाच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

अहमदनगर- नगरसह राज्यभरातील 27 महापालिकांच्या आगामी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.13) मुंबईत काढली जाणार आहे. याबाबत नगरविकास विभागाने महापालिकेला कळविले आहे.

महापालिकेची निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये होवून 1 जानेवारीला विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पदभार घेतला होता. त्यांची अडीच वर्षाची मुदत 30 जून 2021 रोजी संपणार आहे. विद्यमान महापौरपद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहे. पुढील अडीच वर्षाच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.13) नगरविकास विभागाच्यावतीने काढण्यात येणार आहे. पुढील महापौरपद कोणत्या वर्गासाठी आरक्षित होतेय यावर पुढील महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.