माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांना जामीन

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया मनी लॉंडरिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे चिदंबरम तब्बल 106 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. जामीन देताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अन्य अटीही घातल्या आहेत. चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकरणात माध्यमांना मुलाखती देऊ नयेत, तसेच कोणतेही वक्तव्य करू नये. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही.