खोटे आरोप करणारे अभियंतेच खरे भ्रष्टाचारी,महापालिका अधिकार्‍यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी -उपनेते अनिल राठोड

नगर- महापालिकेत अधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरू असून कोणताही अधिकारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत नाही आणि सोडवतही नाही. अभियंते शिवसेनेवर खोटे आरोप करत असून तेच खरे भ्रष्टाचारी आहेत. पथदिवे घोटाळ्यात उपायुक्त, कॅफोनी तुरुंगवास भोगल्याची घटना महाराष्ट्रात प्रथमच नगरमध्ये घडली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

महापालिकेत अधिकार्‍यांना तोंड देणारी शिवसेनाच आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नावर आंदोलन करायला शिवसेना गेली की इतर पक्षाच्या नेत्यांचे ऐकून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करत राठोड म्हणाले की, महापालिका निवडणुकीतील साहित्यावरील खर्च अत्यंत कमी आहे. परंतु अधिकार्‍यांनी त्यावर चौपट खर्च लावला असून याची माहितीही आम्ही मागवली आहे.

गलथान कारभाराचे पुरावे मंत्र्यांना सादर करणार

महापालिकेत जे काही चालले आहे त्यावर केवळ शिवसेनाच बोलत आहे. अधिकार्‍यांचा अत्यंत गलथान कारभार चालू असून काही अधिकारी कमरेला रिव्हॉल्वर लावून पालिकेत येत आहेत. अतिक्रमणांच्या नावाखाली गोरगरीबांच्या टपर्‍या हलवतात आणि मोठ्या लोकांना मात्र मोकळे सोडून देत आहेत. अधिकार्‍यांच्या या गलथान कारभाराचे पुरावे गोळा करुन वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसमोर लवकरच सादर करणार असून संबंधित अधिकार्‍यांवर ठोस कारवाईची मागणी करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

सावेडी कचरा डेपो पेटला कि पेटविला?

महापालिकेचा सावेडी कचरा डेपो पेटला नसून कोणाच्या सांगण्यावरुन पेटवला? याची चौकशीची मागणी शिवसेनेने यापुर्वीच केली आहे. मनपातील अभियंत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उपनेते राठोड म्हणाले की, अभियंत्यांनी सांगितले की आम्हाला दमदाटी होते असे होत असेल तर शहरात पोलीस यंत्रणा आहेच परंतु शहर अभियंता मंडळीकडे दुसर्‍या पक्षांवर कारवाई करण्याची ताकद नाही त्यामुळे ही मंडळी शिवसेनेविरोधात तक्रार करत आहे. खोटी-नाटी प्रकरणे तयार केली जातात. नागरिकांची सेवा करत असल्याचे तुम्ही सांगता परंतु पैसे खाण्याशिवाय तुम्ही काहीच केले नाही. शहरातील कचरा, नालेसफाई, पाणी, रस्ते, लाईट या बाबींकडे दुर्लक्ष करुन दबाव असल्याचे अधिकारी सांगतात तर याला जबाबदार कोण? तुम्ही किती मालमत्ता जमवली याची माहिती जनतेला द्यावी असे राठोड म्हणाले.

अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरातील जनताच भयभीत

अधिकारी, अभियंते भयभीत झाल्याचे म्हणत आहेत. त्यावर बोलताना राठोड म्हणाले, हे अत्यंत चुकीचे आहे शहरात कुठेही फिरता, ऑफीसला येता मग भयभीत कसे? उलट अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे जनता भयभीत झाली आहे. हे अभियंते अनेक वर्षापासून एकाच खात्यात काम करत आहेत. त्यामुळे याचा परिणाम अभियंत्यांच्या आरोग्यावर नाही तर जनतेच्या आरोग्यावर झाला आहे.

प्रभारी शहर अभियंत्या संदर्भात झालेल्या घटनेत अभियंत्यांनी एकजूट दाखवली अशीच एकजूट जनतेच्या कामासाठी का नाही दाखवत? असा सवालही राठोड यांनी केला आहे. विविध मार्गाने दहशत केली जात असल्याचे अभियंत्यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यात कोणतेच तथ्य नाही. सर्वच अभियंते आपआपल्या जातीचे समाजाचे अध्यक्षपद घेऊन शहरात दहशत करत आहेत. सरकारी नोकरी करताना असे अध्यक्षपद घेता येते का? असा सवाल करत नागरिकांना आपली माहिती मागविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी माहिती मागविल्यास त्यात काहीच गैर नाही. नगरसेवक, नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार कोणीही हिरावू शकत नाही असे स्पष्ट करतानाच महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणारच असा निर्धार राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, शाम नळकांडे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, काका शेळके, गिरीश जाधव, सुमित कुलकर्णी, संग्राम शेळके, आशा निंबाळकर, अरुणा गोयल आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा