खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

अहमदनगर  –  १२ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांना तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या चौघा आरोपींचा अवघ्या १० तासांत छडा लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. या आरोपींकडून १ गावठी कट्टा, गुप्ती अशी हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संगमनेर येथील व्यापारी प्रकाश फुलचंद कटारिया (रा.वृंदावण कॉलनी,मालपाणी प्लाझा मागे,संगमनेर) हे सदरील ठिकाणी पत्नी, मोठा भाऊ, भावजई तसेच दोन मुले, सुन, दोन नातु असे एकत्र राहतात. त्यांचे मेनरोड संगमनेर येथे कटारिया क्लॉथ स्टोअर नावाचे कापड दुकान आहे. त्यांचा मुलगा महेश प्रकाश कटारिया याचा मोठा मुलगा दक्ष महेश कटारिया (वय १२) हा धृव अॅकॅडमी धांदरफळ येथे इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेतो. तो रोज सकाळी ७.१५ वाजता शाळे करीता घरातुन निघुन घराचे जवळच असलेले मालपाणी प्लाझा इमारती जवळ शाळेची येणारे बस मध्ये बसुन शाळेत जात असतो. आज शुक्रवारी (दि.९) दक्ष हा नेहमी प्रमाणे ७.१५ वाजता घराचे बाहेर समक्ष गेला तो एकटाच होता. त्यांनतर प्रकाश कटारिया सकाळी ०९.३० वा.नेहमीप्रमाणे कापड दुकानावर गेले व दुकानातील व्यवहार पाहत असतांना सकाळी ११वाजता त्यांच्या मोबाईल फोनवर मोबाईल नंबर ९०६७८३०९३३ यावरुन फोन आला. त्यांनी तो घेतला असता समोरुन एक पुरुष “ आपको बच्चे को, किडनॅप किया है “असे म्हणुन त्याने फोन बंद केल्याने त्यांनी लगेच नातु दक्ष याची शाळेत तसेच तो ज्या बस मधुन जातो त्या बस मधील ड्रायव्हर व केअरटेकर यांना फोन करुन माहिती घेता दक्ष हा बस मध्ये तसेच शाळेत आलाच नाही अशी माहिती मिळाली. त्यानंतर कटारिया कुटूंबातील सर्वांनी दक्ष याचा संगमनेर शहरात शोध घेतला परंतु त्याचा शोध लागला नाही. यावरुन त्यांची खात्री झाली की फोन करणाऱ्या आज्ञात व्यक्तीने काहीतरी आज्ञात कारणा करीता दक्ष याला पळवून नेले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

संगमनेरचे पो.नि.अभय परमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि.दिलीप पवार तसेच पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि.दिलीप पवार व त्यांच्या पथकाने संगमनेरचे पो.नि.अभय परमार यांच्याशी समन्वय ठेवत अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींनी दुपारी ३.३० च्या सुमारास मेसेज पाठवून १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी कटारिया यांच्याकडे केली. तसेच पैसे कुठे आणायचे यासाठी ५ वाजता फोन करतो असे सांगितले. याबाबत माहिती मिळाल्यावर पो.नि.दिलीप पवार यांनी पो.नि.अभय परमार यांच्या बरोबरच समांतर तपास यंत्रणा राबविली असता त्यांना संगमनेर मधील विरेश गिरी व त्याच्या साथीदारांनी हा प्रकार केला असून संगमनेर मधील पेरूच्या बागेजवळ मालदाड रोडवर त्या अपहरण केलेल्या मुलाला डांबून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तसेच संगमनेर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सदर चार आरोपी अपहरण केलेल्या मुलाला तेथेच टाकून पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करीत चारही आरोपींना पकडले. त्यांच्या ताब्यातून १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, गुप्ती अशी हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.