ऑगस्ट क्रांतीदिन विशेष – पंडित नेहरू आणि त्यांचा राघो   

जानेवारी १९७१ – शाखा अभियंता म्हणून पिंपळवाडी ते दुर्गाव (ता-कर्जत, जिल्हा-अहमदनगर) WBM प्रकारच्या रस्त्याच्या कामाची तांत्रिक पाहणी करिता जात असे. तेंव्हा सातत्याने गोरेपान, मध्यम उंची, पांढरा स्वच्छ खादीचा कुडता, धोतर, टोपी, हातात काठी असा पेहराव असलेले एक वयोवृद्ध गृहस्थ हसरा चेहरा करून माझ्या मागोमाग चालत. एक दिवस न राहवून मी उद्वेगाने विचारले “कोण हे गृहस्थ नेहमीच विनाकारण मागोमाग फिरतात? नाव काय याचं? बरेच कामगार, गावकरी माझ्या भोवती गोळा झाले. ‘रावसाहेब!, राजाचा राघो म्हणतात त्यांना’ गावकऱ्यांनी खुलासा करून त्यांना पंचायतीत यायला सांगितले. काम आटोपून ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आलो. वृध्द गृहस्थ तेथे बसलेले होते. मी थेट त्यांना विचारले ‘राजाचा राघो असं का म्हणतात तुम्हाला? प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मागोमाग का येता? यावर त्यांनी खुलासा केला……..!

सन-१९४२ मध्ये दुर्दैवाने मला एका खटल्यात सहा महिने शिक्षा झाली. अत्यंत गरिबी असल्याने वकील देता आला नाही. माझी रवानगी विसापूर नंतर येरवडा कारागृहात करण्यात आली.

सन ऑगस्ट-१९४२. महात्मा गांधीनी ब्रिटीशाविरुद्ध ‘भारत छोडो’ चळवळ घोषित केली. संपूर्ण भारतात धरपकड झाली. महात्मा गांधीसह पंडित नेहरू, वल्लभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद अशा एकूण तेरा नेत्यांना अटक करून येरवडा कारागृहात आणले. महात्मा गांधीना येरवडा कारागृह ऐवजी आगाखान प्यालेस मध्ये कैदेत ठेवले व उर्वरित पंडित नेहरुसह बारा नेत्यांची रवानगी १० ऑगस्ट १९४२ मध्ये अहमदनगर किल्ल्यात केली.

या नेत्यांच्या कामाकरिता, ब्रिटीश सरकारने, ज्या कैद्यांचा पुर्वोतिहास व वर्तणूक चांगली होती अशांची नेमणूक केली. माझ्या सुदैवाने मी पंडितजींचा सेवक झालो. सन-१९४३ मध्येच माझी शिक्षा संपली होती तथापि पंडितजी व ब्रिटीश सरकारला विनंती करून ऑगस्ट-१९४२ ते मार्च-१९४५ या कालावधीत मी पंडितजींचा सेवक म्हणून त्यांच्या सान्निध्यात राहिलो.

पंडितजीं भल्या पाहते उठत. योग, व्यायाम झाला कि मला हाक देत. माझे संपूर्ण नाव राघोबा तुकाराम जंजिरे. परंतू शेवटपर्यंत ते मला राघोबा ऐवजी राघो याच नावाने हाक देत. पंडितजींच्या खोलीची साफसफाई, स्नानासाठी पाण्याची बादली भरून ठेवणे, सकाळी ८ वाजता नाश्ता देणे, दुपारी १२ व संध्याकाळी ८ दरम्यान जेवणाच्या हॉल मध्ये जेवणाचे ताट करणे, बागकामात मदत करणे हे माझे काम असे.

पंडितजींचा स्वभाव प्रेमळ, सेवाभावी, शिस्तप्रिय व वक्तशीर असा होता. सर्व नेते वयस्क असल्याने कोणीनाकोणी सतत आजारी असत. त्यांची विचारपूस व मनोभावे सेवा ते करत असत. त्यांच्या जेवणाच्या ताटात भात, भाजी, डाळ, पोळी ई. जागा ठरलेल्या असत. त्यात झालेली चूक मात्र त्यांना आवडत नसे. एखादवेळेस जेवणाची इच्छा नसल्यास ते मला बोलावीत व म्हणत ‘राघो आज मेरा खान आपही खालो’.

बागकाम करणे, निसर्गात रमणे, सतत लेखन व वाचन करणे ह्या त्यांच्या आवडी. किल्ल्यामध्ये त्यांनी सात-आठ महिन्यात एक ग्रंथ लिहून पूर्ण केला. (अर्थात-DISCOVERY OF INDIA- भारत एक खोज). ग्रंथलेखन चालू असतांना ते मला रात्री-अपरात्रीही हाक देत. अत्यंत तत्परतेने मी हजर होत असे. फावल्या वेळेत ते मला शिक्षा का झाली, माझे कुटुंब, गाव, शेती ई. आपुलकीने चौकशी करत. सर्व नेत्यांपैकी डॉ-सय्यद मेहमूद यांची सुटका ऑक्टोबर-१९४४ मध्ये तर उर्वरित सर्व नेत्यांची सुटका मार्च ते मे १९४५ मध्ये झाली. पंडितजींची सुटका होण्या आधी १५ दिवस आधी मला सोडण्यात आले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पंडितजी भारताचे पहिले पंतप्रधान झाले. याचा मला झालेला आनंद कसा सांगू?. सन-१९५२ मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी पंडितजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. मांगी, ता-करमाळा येथील तलावास भेट देऊन सभा घेतली. सभेच्या ठिकाणी माझ्यासारखाच पेहराव व दिसणारे कांहीजण होते. त्यांना पाहून पंडितजींना माझी आठवण झाली. त्याचवेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मला पिंपळवंडीहून अहमदनगरला विश्रामग्रहावर आणले. त्यांनी अक्षरशः मला आलिंगन दिले व स्वतःच्या हाताने ग्लास भरून दुध देऊन माझी, माझ्या कुटुंबाची चौकशी केली. आम्ही अहमदनगरच्या किल्ल्यात आलो. तेथे प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता. पंडितजींनी सर्व नेत्यांच्या खोल्या डोळे भरून पहिल्या. पंडितजींना स्नानाची बादली, झाडांना पाणी घालायचा झारा, अशा अनेक वस्तू दाखवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. लोकाग्रहास्तव, ते ज्या भिंतीवर चढून मला हाक देत व मी ज्या ठिकाणी असत, त्या भिंतीवर चढून व मला माझ्या जागेवर उभा करून त्यांनी सर्वा समक्ष तोंडासमोर दोन्ही हात एकत्र करून मला ‘राघो……!’ अशी हाक दिली. अर्थात मीही माझ्या जागेवरून त्यांच्या हाकेला ओ दिली व धावत जाऊन त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिलो. हे सर्व पाहून पंडितजी क्षणभर भावनावश झाले.

पुढे पुन्हा मे-१९६१ मध्ये पंडितजी नगरला आले. त्याही वेळेस मी त्यांना भेटलो. त्यांनी माझी पुन्हा विचारपूस केली. माझ्या उदार्निर्वाहासाठी पिंपळवंडीतच शेतीकरिता मला जमीन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुढे सन-१९६२ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमती-विजयालक्ष्मी पंडित यांच्या हस्ते मला प्रत्यक्ष जमीन मिळाली. आपल्या रस्त्याचा कांही भाग त्याच जमिनीतून जात आहे. जुन्या आठवणी येतात. विरंगुळा म्हणून तुमच्या सोबत कामावर फिरतो. माझ तुमच्याकडे कांहीच काम नसत.पंडितजी २७-मे-१९६४ रोजी वारले. हि बातमी मला कळली. आता मला ‘राघो’ म्हणून कोण हाक देणार या आठवणीने मी कित्तेक दिवस सैरभैर झालो.

‘राजाचा राघो’ यातील राजा म्हणजे पंडितजी व राघो त्यांचा सेवक म्हणजे मी. महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा-आबासाहेब निंबाळकर यांनी हे नाव ठेवले आहे. आज राघो हयात नाही. दि-२९जून-१९७६ रोजी पिंपळवंडी, ता-कर्जत येथे त्यांचे निधन झाले.

 शब्दांकन -श्रीराम वांढरे – सदस्य, जेष्ठ नागरिक संघ, भिंगार.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा